Nylon Manja Ban: नायलॉन मांजा वापरलात तर 25 हजारांचा दंड; विक्रेत्यांनाही 2.5 लाखांचा फटका
Nylon Manja Ban: नायलॉन मांजा वापरलात तर 25 हजारांचा दंड; विक्रेत्यांनाही 2.5 लाखांचा फटका
नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांवर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे. विक्रेत्यांनाही 2.5 लाखांचा दंड होणार आहे.
पुणे १३ जानेवारी २०२६ : मकर संक्रांतीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून राज्यभरात पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र या उत्सवाला नायलॉन मांजामुळे लागणारी जीवघेणी धार लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्या व्यक्तीस थेट 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये जागरूकतेचा इशाराच न्यायालयाने दिला आहे.
नायलॉन मांजा वापरामुळे दरवर्षी अनेक पक्षी जखमी होतात, काहींचा मृत्यू होतो, तसेच दुचाकीस्वार, पादचारी आणि लहान मुलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नायलॉन मांजा वापरताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर थेट 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. जर अल्पवयीन मुलाकडे नायलॉन मांजा सापडला, तर त्याची जबाबदारी पालकांवर टाकण्यात येणार असून पालकांनाच दंड भरावा लागणार आहे. तर प्रौढ व्यक्तींकडे मांजा आढळल्यास त्याच्यावर थेट कारवाई करण्यात येईल.
विशेष म्हणजे सुरुवातीला नायलॉन मांजासाठी 50 हजार रुपयांचा दंड प्रस्तावित होता. मात्र पालकांनी न्यायालयासमोर केलेल्या विनंतीनंतर दंडाची रक्कम 25 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली आहे. हा नियम केवळ मकर संक्रांतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण वर्षभर लागू राहणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वर्षभर नायलॉन मांजा वापरणे नागरिकांना महागात पडणार आहे.
या दंडाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष खात्यात जमा करण्यात येणार आहे. दंड वसुलीची जबाबदारी महापालिका आणि पोलिस प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. दंडाची वसुली क्यूआर कोडच्या माध्यमातून केली जाणार असून, तात्काळ दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीस 15 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. मुदतीत दंड न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे, नायलॉन मांजाच्या विक्री, साठवणूक आणि वितरणाबाबतही उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांवर 2.5 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी नियमभंग झाल्यास स्वतंत्रपणे दंड भरावा लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांवर मोठा आर्थिक दंड बसणार आहे.
न्यायालयाने पालकांनाही विशेष सूचना दिल्या असून, मुलांना नायलॉन मांजाच्या धोक्यांबाबत योग्य ती माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षित कापसाच्या किंवा पर्यावरणपूरक मांजाच वापरावा, असे आवाहन पोलिस प्रशासन आणि न्यायालयाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी होणार असून, तोपर्यंत प्रशासनाला कठोर अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information