पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, खडकवासला धरणातून 2000 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला धरणातून 2000 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पुण्यात पावसाचा जोर वाढला असून खडकवासला धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुढील 24 तासांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
सायली मेमाणे
१९ जून २०२५ : पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा मारा सुरू असून खडकवासला धरण परिसरात संततधार कायम आहे. परिणामी, धरणातील जलपातळी वाढल्याने बुधवार दुपारी 1 वाजता 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाणी नदीपात्रात सोडल्याने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सायरनद्वारे वारंवार इशारा देण्यात येत आहे.
राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले की, हवामान आणि धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेता विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढू शकतो. त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीतील लोकांनी खबरदारी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी पुणे घाटमाथा, सातारा आणि मावळ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात इंद्रायणी नदीचे पाणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. भक्तिसोपान पूलाचा एक भाग तुटून वाहून गेला असून वारकरी पाण्यातून वाट काढत मंदिरात पोहोचत आहेत. स्थानिक पोलिस मदतीसाठी तैनात आहेत, मात्र परिस्थिती धोकादायक असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे.
मावळ, लोणावळा, कामशेत या भागांमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाल्यांचे प्रवाह वेगाने वाढले आहेत. याच पावसामुळे चांदखेड-आढले मार्गावरील संपर्क तुटला आहे. ओढ्यांना नदीसदृश स्वरूप आल्याने शेतकऱ्यांनाही शेतीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
या परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळेस अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
NewsDotz Official Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
1 thought on “पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, खडकवासला धरणातून 2000 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा”