Nashik Election Result 2026: नाशिकमधील मनसेचा बालेकिल्ला कोसळला, केवळ 1 जागेवर समाधान
Nashik Election Result 2026: नाशिकमधील मनसेचा बालेकिल्ला कोसळला, केवळ 1 जागेवर समाधान
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. एकेकाळी 39 नगरसेवक निवडून देणाऱ्या नाशिककरांनी यंदा मनसेला फक्त 1 जागा दिली. पराभवामागची कारणे जाणून घ्या.
पुणे १८ जानेवारी २०२५: नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा निकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे. एकेकाळी नाशिक महापालिकेवर सत्ता गाजवणारी आणि 39 नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने महापौरपद मिळवणारी मनसे आज अक्षरशः नामशेष झाल्याचं चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मनसेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं असून, हा पक्षासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे.
राज ठाकरे यांनी अनेक वेळा नाशिकमधील विकासकामांचा दाखला देत हा शहर मनसेचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला होता. मात्र 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीतच मनसेच्या घसरणीला सुरुवात झाली. थेट सत्तेतून घसरत केवळ पाच जागांपर्यंत आलेल्या मनसेला यावेळी महाविकास आघाडीबरोबर निवडणूक लढूनही अपेक्षित यश मिळवता आलं नाही. उलट, पक्षाच्या खात्यात फक्त एकच नगरसेवक निवडून आल्याने नाशिकमधील मनसेची ताकद संपल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पराभवामागे अनेक कारणे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षातील सातत्याने होत असलेली गळती. मनसेतील अनेक अनुभवी आणि निष्ठावंत कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांत दाखल झाले, तर काहींनी राजकारणापासूनच अलिप्त राहणं पसंत केलं. याशिवाय स्थानिक पातळीवर ठोस नेतृत्वाचा अभाव जाणवत राहिला. राज ठाकरे यांची करिष्माई प्रतिमा असली, तरी स्थानिक नेतृत्वाला पुरेसा पाठिंबा आणि स्वायत्तता न मिळाल्याने संघटना कमकुवत झाल्याचे बोलले जाते.
निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णयही मनसेच्या अडचणी वाढवणारा ठरला. काही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्याचा थेट फटका मतदानावर पडला. याशिवाय, निवडणुकीदरम्यान स्पष्ट भूमिका न मांडता कधी आघाडी, कधी स्वतंत्र वाटचाल अशा गोंधळलेल्या राजकीय निर्णयांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून मनसेत आलेले दिनकर अण्णा पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला आणि त्यानंतर लगेचच काही नेत्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या घडामोडींमुळे पक्षाची प्रतिमा मतदारांमध्ये डळमळीत झाली.
इतक्या मोठ्या पराभवानंतर आता मनसेपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये संघटनात्मक फेरबदल करतील का, नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष पुन्हा उभा करतील का, की नाशिकमधील राजकीय लढाईत मनसेची भूमिका दुय्यमच राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या राजकारणात मनसे पुन्हा उभी राहते की इतिहासजमा होते, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information