देवेंद्र फडणवीस : “आळंदीत कत्तलखाना होणार नाही”; मुख्यमंत्र्यांची स्पष्ट घोषणा

0
आळंदीत कत्तलखाना होणार की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले

आळंदीत कत्तलखाना होणार की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले

आळंदीत कत्तलखाना होणार की नाही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले – ‘त्या आरक्षणासाठी मी स्वत: आदेश दिले आहेत’.

सायली मेमाणे

पुणे, २१ जून २०२५ : आळंदी शहराजवळ विकास आराखड्यात प्रस्तावित कत्तलखान्याच्या आरक्षणावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडत स्पष्ट भूमिका घेतली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, आळंदी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून त्या परिसरात कत्तलखाना होणे शक्यच नाही. “त्या विकास आराखड्यात ज्या ठिकाणी कत्तलखान्यासाठी आरक्षण देण्यात आले होते, ते मी स्वतः रद्द करण्याचे आदेश दिले आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

या मुद्द्यावर वारकरी संप्रदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सरकारकडून यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतल्याने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे. फडणवीसांनी वारकऱ्यांना आश्वासन दिले की, “कोणत्याही परिस्थितीत आळंदी परिसरात कत्तलखाना सुरू होऊ दिला जाणार नाही.”

तसेच, यावेळी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धरण व्यवस्थापनावरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, सध्या अनेक धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. “आपण पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कोणत्या वेळी विसर्ग सुरू करायचा, थांबवायचा – याचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. बाजूच्या राज्यांशी समन्वयासाठी आमचा एक अभियंता पावसाळ्यात तिथेच तैनात असतो,” असे ते म्हणाले.

निसर्गाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की, हवामानातील बदल लक्षात घेता सरकारने पूर्वतयारी केली आहे. “पावसामुळे कुठेही मोठ्या आपत्तीजनक स्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

याच वेळी, पुणे विद्यापीठाच्या जागतिक मानांकनातील प्रगतीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “पुणे विद्यापीठ जगातील पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवू शकलं आहे याचा मला अभिमान आहे. पुढील दोन वर्षांत हे विद्यापीठ पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये यावं अशी अपेक्षा आहे. कुलगुरू, प्राध्यापक आणि प्रशासन यांचं मी अभिनंदन करतो.”

फडणवीसांनी सूचित केले की, लवकरच विद्यापीठातील रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. उच्च शिक्षण क्षेत्राच्या दर्जात्मक उन्नतीसाठी सरकारकडून आवश्यक निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed