पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक; देशव्यापी संप यशस्वी, पाच दिवसीय आठवड्यासाठी जोरदार आंदोलन
पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक; देशव्यापी संप यशस्वी, पाच दिवसीय आठवड्यासाठी जोरदार आंदोलन
पाच दिवसीय बँकिंग आठवड्याच्या मागणीसाठी पुण्यात बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. देशव्यापी संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, वाचा सविस्तर.
पुणे २७ जानेवारी २०२६ : पुण्यात बँक कर्मचाऱ्यांचा संताप पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाच दिवसीय बँकिंग आठवड्याच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. या संपाला सर्व राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभर टक्के सहभाग नोंदविला. पुणे येथील स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.
बँक कर्मचाऱ्यांच्या मते, पाच दिवसीय कामकाजाचा आठवडा ही त्यांची अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे. मार्च 2024 मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये ही मागणी मान्य करण्यात आली होती. मात्र, करार होऊन जवळपास दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शेवटी संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी स्पष्ट केले.
राजेश मुळे यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. ग्राहक सेवा, डिजिटल बँकिंग, सरकारी योजना आणि विविध आर्थिक उपक्रमांची जबाबदारी बँक कर्मचाऱ्यांवर वाढली आहे. अशा परिस्थितीत सहा दिवसांचा कामकाजाचा आठवडा कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी, वैयक्तिक आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी वेळ देता येईल, असे त्यांनी नमूद केले.
बँक कर्मचाऱ्यांनी यावेळी इतर वित्तीय संस्थांचे उदाहरणही दिले. इन्शुरन्स क्षेत्र, रिझर्व्ह बँक, शेअर मार्केट आणि अनेक खासगी वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसीय कामकाजाची अंमलबजावणी आधीच करण्यात आली आहे. मात्र, बँकिंग क्षेत्रातच याबाबत होत असलेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. समान कामासाठी वेगवेगळे नियम का, असा सवालही आंदोलक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
या संपाचा थेट परिणाम बँकिंग व्यवहारांवर झाला असून, अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मते, ग्राहकांना त्रास देणे हा उद्देश नसून, आपल्या हक्कांसाठी आणि चांगल्या कामकाजाच्या वातावरणासाठी लढा देणे आवश्यक झाले आहे. केंद्र सरकारने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी युनियनकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने लवकरात लवकर पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची अंमलबजावणी न केल्यास भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने आणि संप करण्यात येतील, असा इशाराही राजेश मुळे यांनी दिला आहे. पुण्यासह संपूर्ण देशात झालेल्या या संपामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information