अजित पवार यांना अखेरचा निरोप; बारामतीत अश्रूंचा महापूर, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

0
अजित पवार यांना अखेरचा निरोप; बारामतीत अश्रूंचा महापूर, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

अजित पवार यांना अखेरचा निरोप; बारामतीत अश्रूंचा महापूर, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत शोककळा पसरली आहे. अंत्यदर्शन व अंत्ययात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला असून संपूर्ण शहर व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे.


पुणे २८ जानेवारी २०२६ : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी आणि आक्रमक नेतृत्व हरपल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह महाराष्ट्रातील जनतेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “आमचा वाघ गेला”, “बारामतीचा बाप गेला”, “अजित पवार अमर रहे” अशा घोषणा आज बारामती शहरात घुमत असून प्रत्येक चेहऱ्यावर अश्रू आणि हतबलता दिसून येत आहे. लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला असून भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयातून काटेवाडी येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. अंतिम दर्शनासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळे परिसरात प्रचंड ताण निर्माण झाला होता. पवार बंगल्याचे गेट बंद करणेही कठीण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी १० ते १२ पोलीस कर्मचारी गेट लावण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान काही महिलांना भावनिक धक्क्यामुळे भोवळ आल्याच्या घटना घडल्या. आमदार रोहित पवार हे वारंवार उपस्थित नागरिकांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते.

काटेवाडी येथील अंत्यदर्शनानंतर अजित पवार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या रथात शववाहिकेतून त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. पवार कुटुंबीय, नातेवाईक आणि मोजक्या कार्यकर्त्यांसह ही अंत्ययात्रा काटेवाडी येथून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झाली. रथाच्या पाठीमागे लाखोंचा जनसमुदाय लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी अश्रूंनी डोळे भरून चालताना दिसत होता. “दादा परत या” अशा भावना व्यक्त करत कार्यकर्ते आणि नागरिक आक्रोश करत होते.

बारामती शहरात झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अंत्ययात्रेचा मार्ग बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याने अंत्ययात्रा शहरातून न नेता थेट विद्या प्रतिष्ठानकडे पार्थिव नेण्यात आले. सुरक्षिततेच्या कारणास्तव शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शहरात केवळ तुरळक वर्दळ दिसून येत असून बहुतेक रस्ते ओस पडले आहेत.

अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिक रस्त्याच्या कडेला बसून घडलेल्या घटनेवर चर्चा करताना दिसत आहेत. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू असून शब्द अपुरे पडत आहेत. “आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला” अशी भावना सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण व्यक्त करत आहे.

अजित पवार यांचा अंत्यविधी होईपर्यंत बारामतीतील संपूर्ण व्यवहार बंद राहणार असून संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले आहे. राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ ठसा उमटवणाऱ्या नेत्याला अखेरचा निरोप देताना महाराष्ट्राने आज आपल्या लाडक्या दादाला अश्रूंनी निरोप दिला आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed