रुतुजा गुरवचे सुवर्ण यश! कोल्हापूरच्या पोरीने आशियाई कुस्ती स्पर्धेत रचला इतिहास
17 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला.
गवंडी वडिलांच्या ऋतुजा गुरवने 17 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकत कुटुंबाचा आणि देशाचा सन्मान वाढवला.
सायली मेमाणे
कोल्हापूर २५ जून २०२५ : कोल्हापूरच्या ऋतुजा गुरव हिने 17 वर्षांखालील गटातील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या विजयाने केवळ खेळप्रेमींनाच नव्हे, तर सामान्य जनतेलाही प्रेरणा दिली आहे. विशेष म्हणजे, ऋतुजाचे वडील संतोष गुरव हे गवंडी काम करत असून, आपल्या मुलीच्या कुस्तीच्या स्वप्नासाठी त्यांनी हातउसने पैसे घेतले होते. त्यांच्या त्यागाचा आज सुवर्ण परीणाम झाला आहे.
ऋतुजा लहानपणापासूनच मुलांबरोबर कुस्ती खेळत होती. तिच्या आवडीला प्रोत्साहन देताना वडिलांनी आर्थिक अडचणी असूनही मागे हटण्याचे टाळले. त्यांनी तिच्या सरावासाठी काहींकडून मदत घेतली, तर काहींनी त्यांना थेट हातउसने पैसे दिले. गेल्या वर्षी 15 वर्षांखालील गटात रौप्यपदक जिंकल्यानंतर, यंदा सुवर्ण मिळवण्याची महत्त्वाकांक्षा तिच्यात अधिक प्रबळ झाली होती.
स्पर्धेतील अंतिम फेरीत ऋतुजाने उझबेकिस्तानच्या तिसऱ्या मानांकित माशखुरा अब्दुमुसाएवा हिला अवघ्या ११-० अशा फरकाने पराभूत करत सामन्याआधीच विजय मिळवला. उपांत्य फेरीत तिने महिला कुस्तीत ताकदवान मानल्या जाणाऱ्या जपानच्या कोहारू अकुत्सू हिला ४-२ ने हरवले होते. ऋतुजाचे आठवे मानांकन असूनही, तिने मोठे आव्हान पेलत सर्वोच्च पदक पटकावले.
या यशामागे तिच्या कुटुंबीयांचा त्याग आणि ऋतुजाची अथक मेहनत दिसते. तिचे वडील म्हणतात, “पूर्वतयारीसाठी कर्ज घेतले होते, आता तिच्या बक्षिसातून ते फेडण्यात येत आहे. भविष्यातही आम्ही तिच्या मागे आहोत.”
महिला कुस्तीगिरांनी आशियाई स्पर्धेत चांगले यश मिळवले. पहिल्या दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई भारताने केली. मनीषाने ६९ किलो गटात चीनच्या खेळाडूवर ८-० असा विजय मिळवून आपले अव्वल मानांकन सिद्ध केले. चेस्ता (४० किलो) आणि तिना पुनिया (६१ किलो) यांनी आपापल्या गटात रौप्य पदक मिळवले.
ऋतुजा गुरवने भारताला ज्या पद्धतीने सुवर्ण दिले, ते फक्त खेळातील विजय नव्हे, तर कठोर मेहनतीचा, जिद्दीचा आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचा अभिमानास्पद ठसा आहे. तिचा हा प्रवास देशातील हजारो खेळाडूंसाठी आदर्शवत ठरेल.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz