Pune Crime: सात महिन्यांचे अर्भक डबक्यात टाकले; विमाननगरमधील धक्कादायक घटना, संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात
पुणे विमाननगरमध्ये सात महिन्यांच्या मुलीचे मृत अर्भक डबक्यात सापडले
पुणे विमाननगरमध्ये सात महिन्यांच्या मुलीचे मृत अर्भक डबक्यात सापडले; संशयित महिला ताब्यात, पोलिस तपास सुरू.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : पुणे शहराच्या विमाननगर भागात एका अत्यंत धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. कोणार्क फेज १ येथील लेबर कॅम्पजवळील स्वच्छतागृहाच्या बाजूला असलेल्या डबक्यात एक सात महिन्यांचे मृत स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका संशयित महिलेला ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेने महाराष्ट्रात अजूनही मुलगी जन्माला आली की ‘ती’ नकोशी का वाटते? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोणार्क पार्क फेज १ मधील लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर या अर्भकाच्या मृत्यूचा संशय व्यक्त केला जात आहे. फिर्यादी दिग्विजय देसाई हे याच कॅम्पमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असून, मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे अर्भक डबक्यात आढळल्याचे पाहून तात्काळ पोलिसांना माहिती दिली. विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि अर्भक ताब्यात घेऊन ते रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेत जेव्हा निष्पाप जीवाची कहाणी समोर येते तेव्हा समाज म्हणून आपण कुठे आहोत? हा आत्मपरीक्षणाचा विषय ठरतो. एकीकडे स्त्री सक्षमीकरणासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘सुकन्या समृद्धी योजना’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यांसारख्या योजना राबवण्यात येत असताना प्रत्यक्षात मात्र अजूनही मुलींचा जन्म काही घरांत अवांछित मानला जातो हे विदारक वास्तव समोर येते.
या घटनेमुळे समाजात खदखद असलेली लैंगिक असमतोलाची मानसिकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. अर्भक स्त्री जातीचे असल्याने त्याचा टोकाचा निषेध होत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले जात आहे. मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ कायदाच नव्हे, तर मानसिकता बदलण्याची आणि स्त्रीजन्माचा आदर करण्याची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते आहे.