जालन्याचं आश्चर्यकारक रूप: महाराष्ट्रातील हे छोटंसं शहर बनलं ‘स्टील सिटी’ – जाणून घ्या यशोगाथा

0
जालन्याचं आश्चर्यकारक रूप: महाराष्ट्रातील हे छोटंसं शहर बनलं ‘स्टील सिटी

जालन्याचं आश्चर्यकारक रूप: महाराष्ट्रातील हे छोटंसं शहर बनलं ‘स्टील सिटी

महाराष्ट्रातील जालना शहर हे शिक्षण, आरोग्य आणि सिंचनात मागे असलं तरी स्टील उत्पादनात देशात आघाडीवर आहे. ७०च्या दशकात सुरू झालेल्या उद्योगाने जालन्याला दिलं ‘स्टील सिटी’चं मानाचं स्थान.

सायली मेमाणे

२७ जून २०२५ : महाराष्ट्रातील एक छोटंसं शहर जालना, ज्याला अनेकांना शिक्षण, सिंचन आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागास समजलं जातं, आज स्टील उत्पादनात देशात अग्रेसर आहे. ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या शहराने बांधकाम क्षेत्रासाठी लागणारं स्टील देशभरातच नव्हे तर परदेशातही निर्यात केलं जातं. ही कहाणी आहे एका दृष्टीकोनातून उभारलेल्या उद्योग साम्राज्याची.

जालन्यातील स्टील उद्योगाची सुरुवात १९७० च्या दशकात झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या ‘रोटी, कपडा और मकान’ या घोषणेमुळे देशभरात औद्योगिक जागरूकता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शहराचा दौरा केला. या दौऱ्यानंतर एक महिन्याच्या आत २ लाख रुपयांची गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारण्याचा विचार पुढे आला. ही जबाबदारी शांतीलाल पित्ती यांनी घेतली.

पित्ती कुटुंबाचा पूर्वीपासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता, त्यामुळे भांडवल उभारण्यात अडचण आली नाही. त्यांनी औरंगाबाद महामार्गालगत पहिला स्टील उद्योग सुरू केला. सुरुवातीला कोळशाच्या भट्टीत लोखंड वितळवून शेतकी साहित्य तयार केलं जायचं. पण त्यांनी पंजाबमधून कुशल कारागीर आणि आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येत या उद्योगाला दिशा दिली. नंतरच्या काळात इलेक्ट्रिक फर्नेसचा वापर सुरू झाला आणि स्टील उत्पादनाची गती वाढली.

१९८० ते ९० च्या दशकात स्टील उद्योगाने जालन्यात भक्कम पाय रोवले. एकेकाळी जालना औद्योगिक वसाहतीत ४० पेक्षा अधिक स्टील कारखाने होते. काही अडचणींमुळे त्यातील अर्धे बंद पडले, मात्र १९९० नंतर आलेल्या TMT (जर्मन टेक्नॉलॉजी) मुळे स्टीलची गुणवत्ता वाढली आणि जागतिक मागणी वाढू लागली.

आज जालन्यातील पोलाद, एसआरजी, मेटारोल, राजूरी, कालिंका यांसारखे ब्रँड दररोज लाखो टन स्टील तयार करतात आणि जगभरात यांची निर्यात केली जाते. जालना हे भारताच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथील स्टील देशाच्या सर्व राज्यांमध्ये सहज पोहोचवलं जातं.

हा प्रवास एक प्रेरणादायी उदाहरण आहे की दृष्टीकोन, जोखीम आणि नवकल्पनांनी कोणताही मागास समजला जाणारा भाग उद्योगक्षेत्रात जागतिक नकाशावर स्थान मिळवू शकतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed