Daund Politics: दौंडच्या १७ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा; पुणे विधान परिषद निवडणुकीचे समीकरण बदलले

Daund Politics: दौंडच्या १७ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा; पुणे विधान परिषद निवडणुकीचे समीकरण बदलले
पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत दौंडच्या १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता.
पुणे २१ मे २०२६ : पुणे जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच महायुतीतील घटक पक्षांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, दौंड नगरपालिकेतील १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने या निवडणुकीतील संपूर्ण समीकरण अचानक बदलले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने या जागेवर त्यांचा पारंपरिक दावा मानला जातो. गेल्या दोन कार्यकाळांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले करत होते. त्यामुळे यंदाही ही जागा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील एकूण मतदारांची संख्या सुमारे ८०४ इतकी आहे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४७ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर भाजपकडे ३१९ सदस्य आहेत. शिवसेनेचे ६८ सदस्य, काँग्रेसचे १९ सदस्य, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १७ सदस्य या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
याच दरम्यान दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांच्या नागरी हित संरक्षण मंडळाच्या १७ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपची ताकद वाढली आहे. या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ ३३६ वर पोहोचले असून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील मतांचे अंतर केवळ ११ वर आले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही जागा जिंकण्यासाठी आक्रमक रणनीती आखत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही ही जागा गमावू इच्छित नसल्याने दोन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.
या निवडणुकीत शिवसेनेच्या ६८ सदस्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाचे सदस्य कोणत्या बाजूने मतदान करणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली, तर ‘घोडेबाजार’ होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांचीही नावे संभाव्य उमेदवारांमध्ये घेतली जात आहेत. काही राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एखादे अनपेक्षित नाव पुढे करू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे.
भाजपकडून संग्राम थोपटे, संजय जगताप आणि गणेश बिडकर उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यामुळे पुणे विधान परिषद निवडणूक ही केवळ राजकीय लढत न राहता महायुतीतील अंतर्गत शक्तिपरीक्षा ठरणार का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare