पुण्यातील 69 लाखांच्या सोनं चोरीप्रकरणात मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक; पोलिसांनी 18.66 लाखांचा ऐवज जप्त केला.
सायली मेमाणे
पुणे 30 जून २०२५ : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या 69 लाख रुपये किंमतीच्या सोनं चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत पुणे गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक केली आहे. आरोपीकडून 249 ग्रॅम वजनाचे, सुमारे 18 लाख 66 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीचे नाव रूपसिंह गुलाबसिंह रावत (वय 31, रा. देलरा, दिवेर तहसील, जिल्हा राजसमंद, राजस्थान) असे असून तो एक सराईत गुन्हेगार आहे.
ही घटना पुणे स्टेशनबाहेर 11 जून रोजी घडली होती. मुंबईतील एका प्रसिद्ध पेढीचे कर्मचारी पुण्यातील शाखेत डिलिव्हरीसाठी आले असताना, स्टेशन परिसरात अज्ञातांनी त्यांच्या जवळील 740 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. या दागिन्यांची किंमत सुमारे 69 लाख रुपये होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडे सोपवण्यात आला होता.
तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी शोधमोहीम सुरू केली. यातून रूपसिंह रावत व त्याचे साथीदार हे राजस्थानातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सहायक निरीक्षक आशिष कवठेकर यांच्या नेतृत्वाखालील पथक – ज्यामध्ये अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, संजय जाधव यांचा समावेश होता – राजस्थानातील देलरा गावात पोहोचले आणि तेथून रूपसिंहला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने हे कृत्य साथीदारांसह केल्याचे स्पष्ट केले आहे. त्याच्या शोधमोहिमेदरम्यान तो दोन वेळा पोलिसांच्या हाती लागण्यापासून बचावला होता. मात्र, अखेर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व प्रताप मानकर यांच्या पथकाने पार पाडली. यामुळे पोलिसांचे खाक्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पोलिसांनी नागरिकांना मौल्यवान वस्तूंचे वाहतूक करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर दागिने किंवा रोकड घेऊन प्रवास करताना सुरक्षित वाहतूक प्रणालीचा वापर करण्यास सांगितले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter