Baramati Rain: बारामतीत वादळी पावसाचा तडाखा झाडे उन्मळून पडली, केळी-ऊस पिकांचे मोठे नुकसान

Baramati Rain: बारामतीत वादळी पावसाचा तडाखा झाडे उन्मळून पडली, केळी-ऊस पिकांचे मोठे नुकसान
बारामती शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे कोसळली असून केळी, ऊस आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
पुणे ०६ जून २०२६ : बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांना शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाचा मोठा फटका बसला. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर शेती पिकांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः केळी, ऊस आणि आंब्याच्या बागांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास बारामती शहरात अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली. सातव चौक परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोरील काही मोठी झाडे उन्मळून पडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही वाहनांवर झाडे कोसळल्यामुळे वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
इंदापूर रोड, माळेगाव रोड आणि पाटस रोड या प्रमुख मार्गांवरही अनेक झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र बारामती नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेली झाडे आणि तुटलेल्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
तांदुळवाडी रोडवरील एक धक्कादायक घटना देखील समोर आली. एका भाजी विक्रेत्याच्या स्टॉलजवळ अचानक मोठे झाड कोसळले. त्या वेळी स्टॉलमध्ये महिला विक्रेती आणि काही ग्राहक उपस्थित होते. सुदैवाने झाड थोडक्यात बाजूला पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला. माळवाडीसह विविध गावांमध्ये केळी आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी आंब्याच्या बागांमधील झाडांच्या फांद्या तुटल्या असून फळांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नुकसानीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ज्या ठिकाणी झाडे पडली आहेत त्या ठिकाणी नव्याने वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना दिल्या आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष सचिन सातव आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने युद्धपातळीवर काम सुरू केले. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने रस्त्यांवरील झाडे हटविणे, तुटलेल्या फांद्या बाजूला करणे आणि पाणी तुंबलेल्या भागांतील गटारे साफ करून निचऱ्याची व्यवस्था करणे अशी विविध कामे तातडीने करण्यात आली. त्यामुळे काही तासांतच शहरातील वाहतूक आणि दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर आणण्यात प्रशासनाला यश आले.
बारामतीत झालेल्या या वादळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांनाही मोठा फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare