पंढरपुरात बियाणे आणि खतांची चढ्या दराने विक्री; भरारी पथक नावालाच?
पंढरपुरात बियाणे आणि खतांची चढ्या दराने विक्री; भरारी पथक नावालाच?
पंढरपूर तालुक्यात खत आणि बी-बियाण्यांची जादा दराने विक्री सुरू असून कृषी विभागाचे भरारी पथक निष्क्रिय असल्याची शेतकऱ्यांची तक्रार. अजित १५५ व अजित ५ बियाण्यांचा दुप्पट दराने खप.
सायली मेमाणे
पंढरपूर १ जुलै २०२५ : पंढरपूर तालुक्यात बळीराजा शेतीच्या कामात गर्क असताना, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या जादा दराने विक्रीमुळे त्यांची आर्थिक लूट सुरू असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्याने खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कपाशी, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना बियाणे आणि खत खरेदी करताना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
कृषी सेवा केंद्र चालक काही बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवून त्यांची दामदुप्पट किंमतीने विक्री करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अजित १५५ आणि अजित ५ या कपाशी बियाण्यांच्या किंमती अनेक केंद्रांवर दुप्पट दराने आकारल्या जात आहेत. एवढेच नाही तर विक्रीवेळी शेतकऱ्यांना कमी रकमांचे दुकान बिल दिले जाते आणि प्रत्यक्षात अधिक पैसे घेण्यात येत आहेत. काही केंद्र चालक तर बाहेरून निकृष्ट दर्जाचे बियाणे आणून जवळच्या नातेवाईकांच्या घरी साठवतात आणि नंतर दिशाभूल करून त्याची विक्री करतात.
या सर्व प्रकारांवर कृषी विभागाचे भरारी पथक कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. खरीप हंगाम सुरू होतानाच अशी लूट सुरू असेल तर संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांची काय अवस्था होईल, हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. शेतकऱ्यांना वेळेत, योग्य दरात व दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळावीत यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे.