जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर राऊतांचा हल्लाबोल

0
जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर राऊतांचा हल्लाबोल

जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News: सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय राऊतांनी जोरदार टीका केली. ‘जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?’ असा सवाल करत राऊतांनी पक्षनिष्ठेवर भाष्य केले.

पुणे ०१ जुलै २०२६ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या निर्णयावर निशाणा साधला. “जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते आमचे काय होणार?” अशा शब्दांत त्यांनी अहिर यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊत म्हणाले की, सचिन अहिर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शरद पवार यांनी मंत्रीपद, म्हाडाचे अध्यक्षपद, मुंबई अध्यक्षपद यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. एवढे सर्व मिळाल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि नंतर शिवसेनेत आले. त्यामुळे अशा व्यक्तीकडून कायमस्वरूपी निष्ठेची अपेक्षा ठेवणे कठीण असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताना राजकीय भविष्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले असले तरी शिवसेना आता अशा धक्क्यांमुळे खचणारी राहिलेली नाही, असे राऊत यांनी म्हटले. “शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी असलेली संघटना आहे. गेल्या काही वर्षांत पक्ष ‘धक्का-प्रूफ’ झाला आहे. एखादा नेता गेला म्हणून पक्ष संपत नाही,” असे ते म्हणाले.

राऊत यांनी पुढे सांगितले की, सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी होते. त्यांना पक्षात कोणी भेटत नव्हते किंवा त्यांचे कोणी ऐकत नव्हते, असा दावा ते करू शकत नाहीत. ते नियमितपणे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेत होते. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी काही सहकाऱ्यांना संदेश पाठवून “ही माझी अपरिहार्यता आहे आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी हा निर्णय घेत आहे,” असे सांगितल्याचा दावाही राऊत यांनी केला.

“सचिन अहिर हे मूळचे शिवसैनिक नव्हते. त्यामुळे अशा घटनांनंतर पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पक्षाची खरी ताकद निष्ठावंत आणि मूळ शिवसैनिकांमध्येच असते. इतर अनेक जण परिस्थितीनुसार येतात आणि जातात,” अशी टिप्पणी त्यांनी केली.

राजकीय पराभवानंतर आदित्य ठाकरे यांनीच सचिन अहिर यांना पुन्हा संधी दिली, असा दावा करत राऊत म्हणाले की, त्यांना विधान परिषदेवर आमदार केले, उपनेतेपद दिले, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्षपद दिले आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारीही सोपवली. एवढे सर्व मिळाल्यानंतरही त्यांनी ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिकांना अंधारात ठेवून पक्ष सोडणे योग्य नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना भविष्यात पदे किंवा उमेदवारी मिळू शकते, असे सांगताना राऊत यांनी इशाराही दिला. “तो त्यांचा राजकीय प्रवास आहे, पण त्या प्रवासातील अनेक टप्पे इतिहासात त्यांच्या नावावर कलंक म्हणून नोंदवले जातील. पदाशिवाय राहता येत नसेल, तर ती लालसा शेवटी राजकीय कारकिर्दीचा अंत करू शकते,” असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधताना राऊत म्हणाले की, आज त्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्यामुळे ते नेत्यांना पक्षात आणू शकतात. मात्र कोणत्याही पदाचा किंवा पैशाचा मोह नसलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना फोडून दाखवा, मग त्याचा आनंद साजरा करा, असे आव्हान त्यांनी दिले. :::

Follow us on our social media handles:
Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed