बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मुंबई हायकोर्टाची मोकळीक; सर्व याचिका फेटाळल्या
बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मुंबई हायकोर्टाची मोकळीक
बाळासाहेब ठाकरे स्मारक प्रकल्पास विरोध करणाऱ्या सर्व जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या. सात वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मारक प्रकल्प आता मार्गी लागणार.
सायली मेमाणे
पुणे १ जुलै २०२५ : बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मारकासंदर्भात गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या स्मारकाविरोधातील सर्व जनहित याचिका फेटाळत प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे स्मारकाचे भवितव्य स्पष्ट झाले असून उभारणीला कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
भगवानजी रयानी, पंकज राजमाचीकर, जन मुक्ती मोर्चा आणि संतोष दौंडकर या याचिकाकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रकल्पाला आक्षेप घेतला होता. यामध्ये महापौर बंगल्याचा वापर, भूवापर बदल, नाममात्र भाडेपट्टा आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचे मुद्दे मांडण्यात आले. प्रकल्पामुळे नागरिकांचे नुकसान होत असल्याचे सांगत, या स्मारकास अडथळा आणण्याचा प्रयत्न याचिकांद्वारे करण्यात आला होता.
मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने २४ जून रोजी अंतिम सुनावणी घेतली होती. १ जुलै रोजी निर्णय जाहीर करताना सर्व याचिका फेटाळल्या. न्यायालयाने सांगितले की, भूवापर बदलासाठी कायद्याच्या चौकटीत राहून अधिसूचना व शुद्धीपत्रकाद्वारे सूचना-हरकती मागवण्यात आल्या. तसेच अनेक वेळा सरकारने सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन नाममात्र शुल्काने दिली आहे आणि हा धोरणात्मक निर्णय मान्य आहे.
प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या शासकीय न्यासात ठाकरे कुटुंबीयांचा समावेश आहे. याचिकाकर्त्यांनी हा न्यास खाजगी असल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने राज्य सरकार, महापालिका व न्यासाचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्याला फेटाळले. न्यासातर्फे सांगण्यात आले की, महापौर बंगला यथास्थित ठेवण्यात आला असून त्याचे नूतनीकरण वारसा वास्तूच्या नियमांनुसार करण्यात आले आहे. परिसरातील झाडे व वातावरणही तसेच राखण्यात आले आहे.
या निर्णयामुळे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या उभारणीला कायदेशीर अडथळा राहिलेला नाही. शिवसैनिकांसाठी आणि ठाकरेप्रेमी नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून स्मारकाच्या लवकर लोकार्पणाची शक्यता आता बळावली आहे.