• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

150 कोटींच्या जमीन गिफ्ट प्रकरणात भुमरे यांचे चालक अडचणीत; 9 तासांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे

Jul 1, 2025
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 150 कोटी रुपयांच्या जमीन गिफ्ट प्रकरणाने खळबळछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 150 कोटी रुपयांच्या जमीन गिफ्ट प्रकरणाने खळबळ

खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख याची 150 कोटींच्या जमीन गिफ्ट प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 9 तास चौकशी; समाधानकारक उत्तरे न दिल्याने पुन्हा चौकशीला बोलावले.

सायली मेमाणे

छत्रपती संभाजीनगर १ जुलै २०२५ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 150 कोटी रुपयांच्या जमीन गिफ्ट प्रकरणाने खळबळ उडवली असून, या प्रकरणात थेट खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख अडचणीत आले आहेत. सालारजंग घराण्याचे वंशज मीर मेहमूद यांनी जावेद शेखला ही जमीन हिबानाम्याद्वारे गिफ्ट केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी जावेद शेखला बोलावून तब्बल नऊ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली.

या चौकशीत शेख जावेद याने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे समजते. त्याला दिलेल्या प्रश्नावलीमध्ये त्याचे मीर मेहमूद यांच्याशी असलेले नाते, जमीन गिफ्ट कशाच्या आधारावर मिळाली, आणि आधीच इतर तक्रारदारांच्या नावे असलेला हिबानामा त्याच्याच नावे कसा केला गेला यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. मात्र जावेद या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याचे ठरवले आहे.

या प्रकरणी एका वकिलांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी सुरू करण्यात आली असून, भुमरे कुटुंबियांनी आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिले आहे की, जावेद हा त्यांचा चालक असला तरी त्याच्या वैयक्तिक व्यवहारांशी त्यांचा काही संबंध नाही. तो फक्त कामाच्या वेळेत येतो-जातो, त्यानंतर तो काय करतो याची त्यांना माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जमीन हस्तांतराच्या व्यवहाराच्या भोवती संशयाचे सावट आहे. हिबानामा प्रकरणात दोनदा जमीन हस्तांतरित झाल्याचे दाखवण्यात आले आहे, त्यामुळे कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, संबंधित जमीन दीडशे कोटी रुपयांच्या किंमतीची असल्यामुळे, ही बाब केवळ पोलिस चौकशीपुरती मर्यादित राहणार नसून राजकीय आणि कायदेशीर पातळीवरही चर्चेचा विषय बनली आहे.

राजकीय वर्तुळात या प्रकरणाचे पडसाद उमटत असून, भुमरे यांचा चालक असल्यामुळे चर्चेचा रोख थेट त्यांच्या दिशेने वळलेला दिसतो. आता पुढील चौकशीमध्ये काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune