• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

वाकड, पुनावळेतील सेवा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; महापालिकेचे महामार्ग प्राधिकरणाला दखलपत्र

Jul 1, 2025
पिंपरी महापालिकेने NHAI ला दुरुस्तीचे पत्र पाठवले.पिंपरी महापालिकेने NHAI ला दुरुस्तीचे पत्र पाठवले.

वाकड, पुनावळे, रावेत येथील सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या; पिंपरी महापालिकेने NHAI ला दुरुस्तीचे पत्र पाठवले.

सायली मेमाणे

पुणे १ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा पुणे-बंगळुरू (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण महामार्ग आणि त्यालगत असलेले रावेत, किवळे, वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील सेवा रस्ते सध्या अत्यंत दुरवस्थेत आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, वाहतूक कोंडी व पावसाळ्यातील साचलेल्या पाण्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

या समस्येबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) पत्र पाठवले असून, तातडीने खड्डे बुजविणे आणि बंद अवस्थेतील सात नळकांडी (Pipe Culvert) पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. महापालिकेचे सहशहर अभियंता देवन्ना गहूवार यांनी याबाबत अधिकृत पत्र दिले असल्याचे समजते.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी निचरा व्यवस्था नाही. सात पूल मातीने पूर्णपणे भरले गेले असून, त्यामुळे पश्चिमेकडून येणारे पाणी पूर्वेकडे जाऊ शकत नाही. परिणामी, रस्त्यावर पाणी साचून राहते व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. पावसामुळे रस्त्यांवर वारंवार खड्डे तयार होत असून, त्यामुळे अनेक अपघातांची शक्यता निर्माण होते.

पूर्वी काही सेवा रस्ते महापालिकेच्या देखरेखीखाली होते, मात्र मागील काही वर्षांत NHAI ने या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात सेवा रस्त्यांची अवस्था अजूनही सुधारलेली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळा निर्माण होतो आहे. वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि वाहनांच्या देखभालीसाठी वाढलेला खर्च यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी देखील या विषयावर प्राधिकरणाची पाठपुरावा करत, जर सेवा रस्ता पूर्ण होत नसेल तर किमान ठेकेदारामार्फत खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. सेवा रस्त्यांचा दर्जा सुधारल्याशिवाय या भागातील रहिवाशांना समाधान मिळणार नाही, हे स्पष्ट दिसून येते.

सध्या पावसाळा सुरू असल्याने, पावसाचे पाणी नाल्यापर्यंत न पोहोचता रस्त्यावरच साचून राहते. त्यामुळे पावसाळी पाण्याची वाहिनी बसविणे, नळकांडी पुलांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवणे हे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी प्राधिकरणाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्पष्ट शब्दांत मांडली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune