भारताची अर्थव्यवस्था वेगाने उभी राहत आहे, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून ११ वर्षांच्या प्रगतीचा गौरव – प्रकाश जावडेकर यांचे मत.
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या नेतृत्वात भारताने फक्त देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रात अभूतपूर्व विकास घडवून आणला आहे. ही सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील सकारात्मक बदलांची सिद्धी आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
पिंपरीतील कासारवाडी परिसरात ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत आयोजीत बुद्धिजीवी संमेलनात जावडेकर बोलत होते. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे आणि राहुल जाधव उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले की, गेल्या ११ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था एक वेगवान मार्गावर प्रस्थापित झाली आहे. पायाभूत सुविधांपासून ते डिजिटल इंडिया पर्यंत, प्रत्येक क्षेत्रात केंद्र सरकारने सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैलीत सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, कृषी व शेती सुधारणा, स्टार्टअप्स प्रोत्साहन आणि संरक्षण व्यवस्था यांसारख्या विविध क्षेत्रांत व्यापक कामगिरी झाली आहे.
त्यांनी ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास’ हे घोषवाक्य मोदी सरकारच्या प्रशासनाचे मूलभूत तत्व असून, त्याच संकल्पनेवर देशाची प्रगती सुरू आहे, असे ठामपणे नमूद केले. या ११ वर्षांत देशात वीज, रस्ते, इंटरनेट, रेल्वे आणि बंदर विकास यांसारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातही औद्योगिक शक्यता वाढल्या असून, रोजगारनिर्मितीत मोठी भर पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने जागतिक मंचावर आपली उन्नत प्रतिमा निर्माण केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, G20, ब्रिक्स, क्वाड यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे मत निर्णायक ठरत आहे. विविध देशांशी व्यापार, संरक्षण आणि तांत्रिक करारांमुळे भारताची भूमिका एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून उभी राहिली आहे.
‘संकल्प ते सिद्धी’ हे केवळ एक अभियान नसून, हे देशाच्या नव्या युगाकडे वाटचाल करण्याचे प्रतीक आहे. पुढील काळातही भारताची ही विकासगाथा नव्या उंचीवर जाईल आणि भारत ‘विश्वगुरु’ म्हणून पुन्हा एकदा उभा राहील, असा विश्वासही प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter