Moradabad Crime: संपत्तीच्या हव्यासासाठी पतीचा खून, प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट
संपत्तीच्या हव्यासासाठी पतीचा खून, प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट
कोट्यवधींच्या संपत्तीच्या लालसेत पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. मुरादाबादमधील ही धक्कादायक कहाणी वाचा Crime Diary मध्ये.
सायली मेमाणे
१ जुलै २०२५ : दिल्लीतील एक प्रतिष्ठित गृहस्थ, कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक, भाड्याच्या उत्पन्नातून महिन्याला लाखो रुपये मिळवणारा आणि आयुष्याची पुन्हा सुरुवात करण्यासाठी नव्याने प्रेमात पडलेला रवींद्र कुमार. पण त्याच्या या नव्या प्रेमकथेचा शेवट अत्यंत भयावह ठरेल, याची त्याला कल्पनाही नव्हती. ही गोष्ट आहे मुरादाबादमधील एका अशा पत्नीची, जिने फक्त मालमत्तेसाठी लग्न केलं, आणि अखेरीस प्रियकरासह कट रचत पतीचा खून केला.
रवींद्र कुमार आणि रीना सिंधूची भेट हरिद्वारमध्ये झाली. दोघांमध्ये ओढ निर्माण झाली आणि वयातील २० वर्षांचा फरक विसरून त्यांनी २०११ मध्ये विवाह केला. लग्नानंतर रीना मुरादाबाद येथील रवींद्रच्या आलिशान घरात राहायला आली. रवींद्रने घर तिच्या नावे केलं आणि तिने तिथेच फिजिओथेरपी सेंटर सुरू केलं. पण नातं केवळ वरवरचं होतं. काही महिन्यांतच वाद सुरू झाले आणि रीना फक्त बाह्यतः पत्नी राहिली.
याच काळात तिच्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये परितोष कुमार नावाचा रुग्ण आला. सुरुवातीला वैद्यकीय सेवा, नंतर गुप्त भेटी, आणि मग दोघं प्रेमात. रवींद्र काहीच समजण्याआधी रीना आणि परितोष एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. कोट्यवधींचं घर, स्थिर आर्थिक आयुष्य आणि प्रेमी — रीनासाठी आयुष्य परिपूर्ण होतं. पण अडथळा म्हणजे रवींद्र.
एका आर्थिक व्यवहारात चेक बाउन्स झाल्याने रवींद्रला सहा महिन्यांची शिक्षा झाली. तेव्हा त्याने मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला. हे ऐकताच रीनाचा संताप अनावर झाला. ती आता पतीला संपवण्याच्या योजनेत उतरली. तिने परितोषला १० लाख रुपयांचं आमिष दाखवलं आणि रवींद्रची हत्या करण्याची योजना आखली.
३१ मे २०२५ रोजी रीना रवींद्रला एका ‘पार्टी’च्या बहाण्याने परितोषच्या घरात घेऊन गेली. तिथे भरपूर दारू पाजून त्याला बेशुद्ध केलं आणि नंतर फावड्याने मानेवर आणि छातीवर हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. मृतदेह गाडीत टाकून दोघे उत्तराखंडमधील कोटद्वार येथे गेले आणि निर्जन ठिकाणी मृतदेह टाकून दिला.
५ जून रोजी कोटद्वार पोलिसांना एका अनोळखी मृतदेहाचा शहारा देणारा अहवाल मिळाला. शवविच्छेदनात खून झाल्याचे स्पष्ट झाले आणि तपास सुरू झाला. सीसीटीव्हीत संशयास्पद कार आढळून आली. याच आधारावर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि अखेरीस रीनावर संशय बळावला.
चौकशीत रीनाने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्यासोबत परितोषलाही अटक करण्यात आली. एका लालसेने, एका गैरप्रेमाने आणि संपत्तीच्या हव्यासाने एक निरपराध व्यक्तीला मृत्यूच्या खाईत लोटलं.