इचलकरंजीत आत्महत्येचा प्रयत्न उधळला; पंचगंगा नदीतून महिलेचा जीव वाचवणारे जवान ठरले देवदूत
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मोठा अनर्थ टळला आहे.
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी महिला आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सतर्कतेमुळे बचावली. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत जवानांनी मोठा अनर्थ टाळला.
सायली मेमाणे
इचलकरंजी ४ जुलै २०२५ : इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात मोठा अनर्थ टळला आहे. पंचगंगा नदीत आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या पन्नास वर्षीय महिलेचा जीव महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सतर्क जवानांनी वाचवला आहे. घरगुती वादातून ही महिला पूरग्रस्त नदीत उडी घेण्याचा प्रयत्न करत होती, पण वेळीच पोहोचलेल्या कर्मचार्यांनी तिचे प्राण वाचवले.
ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. घरातील वादामुळे मनस्तापाला कंटाळून संबंधित महिला पंचगंगा घाटावर आली आणि ‘मला जगायचं नाही, तुम्ही सोडा’ असे म्हणत पूरपाण्यात जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठी तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सतर्क होते. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत टीमने तातडीने कारवाई करत महिलेची समजूत काढली आणि तिला सुरक्षितरित्या बाहेर काढले.
ही महिला सध्या तिच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आली आहे आणि तिच्यावर समुपदेशनाच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता ३१ फूट ३ इंच असलेली पातळी रात्री ९ वाजता ३२ फूट २ इंचांवर पोहोचली. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी, पाटगाव, घटप्रभा आदी धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. आलमट्टी धरणातून तब्बल १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी, अनेक नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि काही राज्य मार्ग तसेच ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सध्या पूर्णतः सतर्क असून, नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठीही धरण परिसरात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.
या प्रकारामध्ये दाखवलेल्या तत्परतेबद्दल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं शहरभर कौतुक होत आहे. ज्या वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, अशा प्रसंगी दाखवलेली धाडसी कारवाई अनेकांसाठी प्रेरणादायक ठरली आहे.