युतीबाबत वक्तव्य नको! राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश, राजकीय चर्चांना विराम?
युतीबाबत वक्तव्य नको! राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतीही वक्तव्य न करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले; ठाकरे बंधूंच्या एकत्रित मंचानंतर चर्चा गाजत असताना दिलेले निर्देश.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : मुंबईतील एनएससीआय डोम येथे ५ जुलै रोजी झालेल्या ऐतिहासिक मराठी मेळाव्यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि “मराठी माणूस एकत्र यावा” हा भावनिक सूर दिला. मात्र, युतीच्या बाबतीत कोणताही अधिकृत संकेत न दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, “युतीबाबत कोणतीही सार्वजनिक वक्तव्ये करू नका. यावर बोलायचं असल्यास, माझी स्पष्ट परवानगी आवश्यक आहे.” यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात प्रत्यक्ष युती होईल का, यावर उत्सुकता वाढली आहे.
उद्धव ठाकरे यांनी विजय मेळाव्यात चार वेळा राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे खुले आमंत्रण दिले. त्यांच्या भाषणात ‘एकत्र राहण्यासाठी आलो आहोत’ असा ठाम सूर होता. परंतु राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान युतीबाबत मोजक्या आणि संयमित शब्दांत भूमिका मांडली. त्यामुळे त्यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे दिसून आले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही भूमिका राज ठाकरे यांच्या धोरणात्मक नियोजनाचे सूचक आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिलेले असतानाही, राज ठाकरे यांनी निर्णय घेण्यासाठी वेळ मागितल्यासारखी भूमिका घेतल्याने, पुढील दिशा अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र एकत्रित येण्याच्या शक्यतेबाबत उत्साहित आहेत. सोशल मीडियावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या आहेत. पण अधिकृत निर्णय येईपर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य न करण्याचा मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय युतीसंबंधी चर्चा काही काळ थांबवू शकतो.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर, “राज ठाकरे यांची परवानगी शिवाय कोणीही बोलू नये,” हे वक्तव्य राजकीय दृष्टिकोनातून गंभीर मानले जात आहे. हे सूचित करतं की, मनसे भविष्यातील युतीचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेणार आहे आणि याबाबत पक्षात एकवाक्यता आणि नियंत्रण राखण्याचा प्रयत्न आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, दोन वेगवेगळ्या राजकीय मार्गांनी गेलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रित मंचावर येण्याने मराठी अस्मितेचा नवा अध्याय सुरू होतो का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.