Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला

0
पुणे रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे स्थानकाबाहेर गांधीजींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी तात्काळ अटक केली; आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी.

सायली मेमाणे

पुणे ७ जुलै २०२५ : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर रविवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर एका माथेफिरू व्यक्तीने कोयत्याने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचं नाव सूरज शुक्ला असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आहे. सध्या तो पुण्यात माळा आणि धार्मिक पुस्तके विकण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील वाई येथे वास्तव्य करत असलेला सूरज पुण्यात शहाळं फोडण्यासाठी कोयता विकत घेऊन आला होता. मात्र त्याचा हेतू वेगळाच होता हे या घटनेनंतर स्पष्ट झाले.

घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानक परिसरात अनेक प्रवासी उपस्थित होते. सूरज शुक्ला हा केशरी रंगाचा कुर्ता घालून आला आणि थेट गांधीजींच्या पुतळ्याजवळ असलेल्या चौथऱ्यावर चढून त्याने कोयत्याने पुतळ्यावर वार करण्यास सुरुवात केली. पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर वार करताना तो गांधीजींचं डोकं तोडण्याचा प्रयत्न करीत होता. प्रवाशांनी ही घटना पाहून तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सूरजला ताब्यात घेतलं.

पोलिस तपासात समोर आले आहे की सूरज शुक्ला याच्या मनात गांधीजींबद्दल पूर्वीपासून द्वेष होता. हा द्वेष रविवारी रात्री अचानक उफाळून आला आणि त्यातूनच त्याने हा हल्ला केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाकडून या प्रकाराचा गांभीर्याने तपास सुरू आहे.

हा हल्ला केवळ एका पुतळ्यावर नव्हता, तर तो देशाच्या अहिंसेच्या विचारांवर देखील आघात करणारा आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, आरोपीच्या मानसिक स्थितीचा अधिक तपास सुरू आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed