Akashvani News: आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा ‘आवाज’ चोरला! यूट्युब वाहिनीवर फेरफार करून अपलोड, कायदेशीर कारवाईचे संकेत
आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा ‘आवाज’ चोरला!
आकाशवाणी मुंबईच्या एफएम कार्यक्रमांची स्क्रिप्ट आणि आवाज सॉफ्टवेअरद्वारे बदलून यूट्युबवर अपलोड; कॉपीराइट कायद्याखाली कारवाईचे संकेत.
सायली मेमाणे
मुंबई ७ जुलै २०२५ : मुंबई आकाशवाणीच्या ‘एफएम रेनबो’ आणि ‘एफएम गोल्ड’ या लोकप्रिय रेडिओ वाहिन्यांवरील मूळ मराठी कार्यक्रमांची स्क्रिप्ट आणि निवेदकांच्या आवाजात फेरफार करून ‘मराठी पडद्यामागील किस्से’ नावाच्या एका यूट्युब वाहिनीवर अपलोड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओंवरील टीका करणाऱ्या युजर्सच्या टिप्पण्या हटवल्या जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे आकाशवाणीच्या निवेदकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आकाशवाणी मुंबई केंद्राने आता कॉपीराइट कायद्यानुसार संबंधित यूट्युब वाहिनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
या गैरप्रकाराबाबत काही निवेदकांनी आकाशवाणीच्या केंद्र संचालकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर यासंदर्भात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. युट्युबवरील संबंधित वाहिनीवर गेले काही महिने आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची स्क्रिप्ट अक्षरश: जशीच्या तशी वापरली जात आहे. एवढेच नव्हे, तर निवेदकांच्या आवाजात सॉफ्टवेअर वापरून बदल करत तेच कार्यक्रम स्वतंत्र मालकी असल्याप्रमाणे यूट्युबवर अपलोड करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमांसाठी निवेदक विविध विषयांवर अभ्यास करून मूळ स्क्रिप्ट तयार करतात. यात किस्से, आठवणी, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांची गुंफण असते. त्यावर आवाजात विशेष भावनिक छटा देत श्रोत्यांपर्यंत पोहचवले जाते. यामागे निवेदकांची सखोल मेहनत, तयारी आणि सर्जनशीलता असते. अशा परिस्थितीत कोणीतरी हे सर्व मेहनतीने सादर केलेले कार्यक्रम आपल्या नावावर सादर करत असल्याने हे निवेदकांच्या बौद्धिक संपदेवर सरळ सरळ हक्कभंगाचे आणि चोरीचे प्रकरण ठरते.
या प्रकरणी एका निवेदकाने म्हटले, “आम्ही पहाटे पाच वाजता, कित्येकदा तब्येत बरी नसतानाही, मेहनतीने कार्यक्रम करतो. मात्र आमचा आवाज आणि मजकूर बदलून त्याचा गैरवापर होत असल्याचे पाहून खूपच दुख वाटते. हा बौद्धिक लुट आहे.” काही निवेदकांनी या युट्युब व्हिडीओजखाली प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्या असता, त्याही टिप्पण्या काढून टाकण्यात आल्या. या वाहिनीच्या चालकांचा संपर्क क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो बंद होता किंवा प्रतिसाद मिळाला नाही.
या पार्श्वभूमीवर आकाशवाणी मुंबईचे केंद्र संचालक शैलेश माळोदे यांनी सांगितले की, “आकाशवाणी बौद्धिक संपदा आणि स्वामित्वहक्काबाबत अत्यंत जागरूक आहे. आम्ही इतर कोणाचीही सामग्री परवानगीशिवाय वापरत नाही. त्यामुळे आमचे कार्यक्रम कोणी चोरून स्वतःच्या नावावर सादर करत असेल, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. सोशल मीडियाच्या युगात नियंत्रण कठीण असले, तरी आम्ही ही बाब गांभीर्याने घेत आहोत आणि अधिकृत रीतसर कारवाईस प्रारंभ करणार आहोत.”
ही घटना रेडिओ माध्यमाच्या विश्वातील सर्जनशीलतेच्या शोषणाचा गंभीर प्रकार आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून हजारो श्रोत्यांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यक्रमांची याप्रकारे चोरी केल्यास सर्जनशील व्यक्तींच्या हक्कांचे उल्लंघन होतेच, शिवाय डिजिटल विश्वातील बौद्धिक शिस्तही धोक्यात येते. त्यामुळे यावर त्वरित आणि ठोस कारवाई होणे अत्यावश्यक बनले आहे.