Rojgar Hami Yojana Scam: महिलांच्या नावावर पुरुषांचे फोटो, रस्ते कामात धक्कादायक गैरव्यवहार उघड

0
रोजगार हमी योजनेतील फसवणूक प्रकरण

रोजगार हमी योजनेतील फसवणूक प्रकरण

फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेत मोठा घोटाळा उघड; महिलांच्या नावावर पुरुषांचे फोटो लावून कामाची बिले उचलली. एकाच फोटोचा अनेक मस्टरवर वापर.

सायली मेमाणे

फुलंब्री ७ जुलै २०२५ : फुलंब्री तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेतील रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘मातोश्री पाणंद रस्ते’ या योजनेच्या 119 कामांमध्ये अनेक ठिकाणी मस्टरमध्ये महिलांची नावे असून त्याठिकाणी मात्र पुरुषांचे फोटो लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हा प्रकार केवळ एकदाच नाही तर अनेकवेळा, अनेक गावांमध्ये घडल्याचे उघड झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावर प्रत्यक्षात महिलांनी मजुरी केल्याचे दाखवले गेले असून त्या महिलांचे फोटो न वापरता पुरुषांचे फोटो जोडले गेले आहेत. अनेक मस्टरवर एकच फोटो वेगवेगळ्या नावे आणि गावासाठी वापरण्यात आला आहे. काही ठिकाणी तर केवळ दोन फोटो वापरून तब्बल दोन डझन मस्टर तयार करण्यात आले आहेत. यावरून बिनधास्त फसवणूक व अपहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

या फसवणुकीत केवळ सामान्य मजूरच नव्हे, तर गावांतील प्रतिष्ठित लोकांच्या नावांचाही गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. एका गावात कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन मजूर म्हणून दाखवले गेले आहेत, तर दुसऱ्या गावात पोलिस पाटलाची पत्नी मजूर म्हणून नोंदली गेली आहे. हा प्रकार नेमका कुणाच्या संगनमताने झाला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नियमांनुसार, प्रत्येक दिवशी कामावर असलेल्या मजुरांचे फोटो घेऊन ते ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र, यामध्ये फक्त एका किंवा दोन ग्रुपफोटोचा वापर करून दररोजची हजेरी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये मजुरांची नावे बदलली गेली, पण फोटो मात्र तेच वापरण्यात आले. यामुळे कामासाठी मंजूर झालेले सरकारी निधी योग्य कामासाठी वापरण्यात आला का, यावर गंभीर शंका निर्माण झाली आहे.

या प्रकरणात पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक आणि यंत्रणेसाठी जबाबदार असलेल्यांनी भेटी दिल्या आहेत की नाही, याचीही चौकशी केली जात आहे. कारण नियमानुसार कामे सुरू असताना त्याची पाहणी करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. पण या कामावर इतक्या प्रमाणात अनियमितता होऊनसुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का आली नाही, यावरही आता संशय व्यक्त केला जातो आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद रोहयो विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे याप्रकरणात कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *