OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली दिली जाते कशासाठी? – मुनगंटीवारांचा सरकारकडे थेट सवाल
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली दिली जाते कशासाठी?
ओयो हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कोणत्या कारणासाठी दिली जाते? या गंभीर मुद्द्यावर विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांनी गृहराज्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
सायली मेमाणे
मुंबई ८ जुलै २०२५ : मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल साखळीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजली आहे. मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेल्समध्ये खोल्या एका तासासाठी भाड्याने दिल्या जातात, हे मुद्दामहत्त्वाने अधोरेखित करत सरकारकडे या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विधानसभेच्या चर्चेच्या दरम्यान मुनगंटीवार म्हणाले की, “महाराष्ट्रात अनेक घटना घडत असताना ओयो नावाची एक हॉटेल साखळी सध्या वाढत चालली आहे. मनात शंका येते की, यामागे नेमकं काय चाललं आहे. या हॉटेल्सना ना ग्रामपंचायतीची ना महानगरपालिकेची परवानगी घेतली जाते. तसंच, इथे खोली एका तासासाठी भाड्याने दिली जाते – नेमकं कशासाठी?”
या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गृहराज्यमंत्री यांच्याकडे आग्रहपूर्वक मागणी केली की राज्यभरात किती ओयो हॉटेल्स कार्यरत आहेत याची माहिती सरकारने जाहीर करावी. मुनगंटीवारांनी असेही सूचित केले की, “कोणीही प्रवासी २०-२० किलोमीटर प्रवास करून फक्त एक तासासाठी खोली घ्यायला जात नाही. ही प्रवृत्ती संशयास्पद आहे. जेव्हा प्रवासाचा खर्च हॉटेलपेक्षा अधिक असतो, तेव्हा अशा व्यवहारामागे उद्देश वेगळाच असावा असा संशय निर्माण होतो.”
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या संस्कृती रक्षणाचे सरकार सत्तेत आहे. जर राज्यात संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर अशा प्रकारांची सखोल चौकशी गृहमंत्रालयाने करावी, यासाठी मी सरकारचे लक्ष वेधतो.” त्यांच्या मते, ओयो हॉटेल्सच्या वापरावर पोलिस विभागाने अभ्यास करावा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या परवानग्या देतात, याचा तपास करणे गरजेचे आहे.
या प्रश्नामुळे सभागृहात एकच चर्चेचा माहोल निर्माण झाला. काही विरोधी आमदारांनीही या मुद्यावर सरकारकडे माहिती मागितली. अद्याप गृहमंत्रालयाकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
ओयो हॉटेल ही एक जागतिक ट्रॅव्हल टेक कंपनी असून अनेक राज्यांत ती स्वस्त आणि सुलभ लॉजिंग सुविधा पुरवते. मात्र, तिच्या कार्यपद्धतीवर पूर्वीही काही वेळा टीका झाली आहे. मुनगंटीवारांनी उपस्थित केलेला मुद्दा पाहता, सरकारकडून आता तपशीलवार माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे.