पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार? पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार विशेष बैठक; दादा भुसे यांची विधानसभेत माहिती
पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार
पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार; रिंगरोड, मेट्रो, उड्डाणपूल आणि ग्रीनफिल्ड मार्गांचा समावेश.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच पुण्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलिस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित विभागप्रमुखांची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली आहे.
विधानसभा सदस्य राहुल कूल, महेश लांडगे आणि भिमराव तापकीर यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना भुसे म्हणाले की, वर्ष २०२४ मध्ये पुण्यासाठी एक सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात रिंग रोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्था समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या नऊ बांधकाम पॅकेजेसपैकी ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल, पुणे–शिरूर उन्नत मार्ग आणि पुणे–अहमदनगर–छत्रपती संभाजीनगर सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे कामही सध्या सुरू असून, हे मार्ग पुण्याच्या वाहतुकीला मोठा दिलासा देणारे ठरणार आहेत.
याशिवाय, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या दोन मार्गांवर मेट्रो प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून, त्यांची शक्यता तपासली जात आहे. पुणे शहरात आणि त्याच्या आसपास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित बैठकीत वाहतूक सुधारणा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने बाह्य रिंगरोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. भूमिपूजनाविनाच या प्रकल्पाला प्रत्यक्ष कामाने सुरुवात झाली आहे. यासाठी नऊ कंपन्यांना कार्यादेश देण्यात आला असून, काम जलदगतीने सुरू असल्याची माहिती पुणे विभागाचे MSRDC चे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
या सर्व प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास पुणे शहराला वाहतूक व्यवस्थापनात मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांना वेळ आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यास मदत होईल.