मुंबईच्या अभिनेत्रीमुळे 3 IPS अधिकाऱ्यांचे निलंबन; पोलीस दलात खळबळ, सत्तेचा गैरवापर उघड
मुंबईच्या अभिनेत्रीमुळे 3 IPS अधिकाऱ्यांचे निलंबन; पोलीस दलात खळबळ, सत्तेचा गैरवापर उघड
मुंबईच्या अभिनेत्री कादंबरी जेठवाणी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आंध्र पोलिसांनी अटक केली. चौकशीनंतर तीन वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; पोलिस दलात खळबळ.
सायली मेमाणे
मुंबई १० जुलै २०२५ :मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवाणी यांच्या प्रकरणामुळे आंध्र प्रदेशच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेत्री कादंबरी जेठवाणी व तिच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना ४२ दिवस तुरुंगात ठेवण्यात आल्याच्या गंभीर आरोपांवरुन आंध्र सरकारने तीन वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामुळे सत्तेचा गैरवापर व पोलिसी सत्तेचा दुरुपयोग यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कादंबरी जेठवाणी ही मुंबईतील रहिवासी असून, तिने हिंदी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनय केलेला आहे. तिची मॉडेलिंग क्षेत्रातही मोठी ओळख आहे. तिने मुंबईत एका उद्योगपतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या उद्योगपतीने वायएसआर पक्षातील वरिष्ठ नेत्याच्या मदतीने तिच्यावर दबाव आणण्यासाठी आंध्र प्रदेशातील पोलिस यंत्रणेला हाताशी धरल्याचा आरोप आहे.
या पाश्र्वभूमीवर, आंध्र प्रदेशमधील चित्रपट निर्माता आणि वायएसआर पक्षाच्या पदाधिकाऱ्याने विजयवाडा येथील इब्राहिम पटनम पोलीस ठाण्यात कादंबरी आणि तिच्या पालकांविरोधात जबरदस्ती, फसवणूक आणि धमकावणीचे खोटे गुन्हे २ फेब्रुवारी रोजी दाखल केले. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होण्याच्या दोन दिवस आधीच ३१ जानेवारीला अटकेचे आदेश नोंदवण्यात आले होते.
या आदेशांच्या आधारे, आंध्र पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कादंबरी आणि तिच्या कुटुंबीयांना मुंबई येथून अटक करून थेट विजयवाडा येथे नेले. तिथे त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप खुद्द कादंबरीने केला आहे. तिच्या तक्रारीच्या आधारे आंध्र सरकारने चौकशीचा आदेश दिला आणि सत्तेचा दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले तीन वरिष्ठ IPS अधिकारी म्हणजे – विजयवाडा चे तत्कालीन पोलीस आयुक्त कांधी राणा (IG रँक), तत्कालीन उपआयुक्त विशाल गुन्नी आणि गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख सिताराम अंजनेयलु. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असून त्यांच्यावर अटकेचीही शक्यता आहे.
या निलंबनामुळे संपूर्ण आंध्र प्रदेश पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तसेच, व्यक्तीगत आकसातून कायद्याचा गैरवापर कसा केला जातो याचे हे एक गंभीर उदाहरण मानले जात आहे. अभिनेत्री कादंबरीने मुंबईतील प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्यामुळेच तिच्याविरुद्ध ही कारवाई झाली असल्याचा निष्कर्ष चौकशीतून समोर आला आहे.