Ajit Pawar : दारू कुणीच पिऊ नये, विधानसभेत अजित पवारांचे स्पष्ट मत; दारूबंदीबाबत नियमावलीही स्पष्ट
अजित पवारांचे विधानसभेत वक्तव्य : "दारू कुणीच पिऊ नये", दारूबंदीबाबत महत्त्वाची नियमावली स्पष्ट
अजित पवारांचे विधानसभेत वक्तव्य : “दारू कुणीच पिऊ नये”, दारूबंदीबाबत महत्त्वाची नियमावली स्पष्ट; उत्पादन शुल्क विभागाचा महसूल, अनुभव आणि विधानभवनातील चर्चा.
सायली मेमाणे
मुंबई १० जुलै २०२५ : राज्यातील मद्यविक्री, उत्पादन शुल्क आणि दारूबंदीबाबत विधानसभेत मंगळवारी चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारू कुणीच पिऊ नये, असे स्पष्ट मत मांडले. हे मत व्यक्त करतानाच त्यांनी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाची वास्तविकता आणि दारूबंदीबाबतचे प्रशासनिक नियमही स्पष्ट केले. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण विधानभवन परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते.
भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबईतील खारघर परिसरात दारू विक्री परवाना रद्द करून दारूमुक्त क्षेत्र घोषित करावे, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, महापालिकेने ठराव केला म्हणून दारू दुकान बंद करता येत नाही. त्यासाठी एक ठोस आणि अधिकृत प्रक्रिया आवश्यक असते. 2008 आणि 2009 च्या अधिसूचनेनुसार नगर परिषद किंवा महापालिका क्षेत्रातील एखाद्या प्रभागात जर 25 टक्क्यांपेक्षा अधिक महिला मतदारांनी लेखी निवेदन दिले, तर जिल्हाधिकारी गोपनीय मतदान घेऊ शकतात. जर त्या प्रभागातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिला मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केले, तर त्या ठिकाणी मद्यविक्रीचा परवाना रद्द करता येतो.
अजित पवारांनी यावेळी दारूबंदीच्या पूर्वानुभवाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, पूर्वी राज्य सरकारने एका जिल्ह्यात दारूबंदी केली होती. त्या वेळी झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, शाळेतील मुले शेजारच्या जिल्ह्यातून दारू आणून विकत होती. काही लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांनी मतदारांना दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देत निवडून आले होते. दारूबंदीचा दुष्परिणाम म्हणून हातभट्टी वाढते आणि त्यामुळे आरोग्यविषयक धोके निर्माण होतात. यामुळेच दारूबंदीची अंमलबजावणी करताना संयम आणि सुबुद्ध निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला दरवर्षी मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, अजित पवारांनी स्पष्ट केले की, हा महसूल मिळवण्याची जबाबदारी असली तरी वैयक्तिक मतप्रदर्शन करताना ते म्हणाले की, “दारू कुणीच पिऊ नये, हे माझे वैयक्तिक मत आहे.” त्यांच्या या मताला विरोधी बाकांवरून मिस्कील प्रतिक्रिया मिळाल्या, मात्र विधानभवन परिसरात या विषयावर गांभीर्याने चर्चा सुरु झाली.