Solapur News : जिल्हाधिकाऱ्यांचा सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी अल्पोपहार; आषाढी वारीतील परिश्रमांचे कौतुक
जिल्हाधिकाऱ्यांचा सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी अल्पोपहार
आषाढी वारीच्या यशस्वी आयोजनानंतर पंढरपूरमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला अल्पोपहार. स्वच्छतेबद्दल कौतुक करत दिल्या धन्यवाद.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : Solapur News : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात लाखो भाविकांची गर्दी झाली असतानाही, शहराची स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विशेष कौतुक केले.
2025 सालच्या आषाढी शुद्ध एकादशी निमित्त 26 जून ते 10 जुलै दरम्यान झालेल्या वारीमध्ये 20 लाखांहून अधिक वारकरी आणि भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले होते. त्यात सफाई कर्मचाऱ्यांची कामगिरी अत्यंत मोलाची ठरली.
पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांनी वारी दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या घरी चहा-पाण्याचा अल्पोपहारही घेतला.
स्वच्छतेच्या या यशस्वी मोहिमेमुळे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह अनेक वारकरी व भाविकांनी खुलेपणाने कौतुक केले. वारीमध्ये स्वच्छतेमुळे समाधान मिळाल्याचे अनेक वारकऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या या अनोख्या भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्यासोबत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ एका अल्पोपहारापुरता मर्यादित नसून, प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील माणुसकीचा बंध मजबूत करणारा आहे. वारकरी सेवेबरोबरच, मागे उभ्या असलेल्या कामगारांचाही सन्मान करणे हे सामाजिक भान दाखवणारे पाऊल ठरते.