शिरूर तालुक्यातील आंबळे गावात झालेल्या दरोड्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगार संजय गायकवाडसह दोन जणांना अटक केली असून सहा गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे १२ जुलै २०२५ : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत एक मोठा गुन्हेगारी टोळी उघडकीस आली असून, यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा तब्बल सहा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. या कारवाईत सराईत दरोडेखोर संजय तुकाराम गायकवाड (वय ४५, रा. भोकरदन, जि. जालना) आणि त्याचा साथीदार सागर सुरेश शिंदे (वय १९, रा. मंठा, जि. जालना) यांना अटक करण्यात आली आहे.
दि. ५ जुलै २०२५ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील आंबळे गावात कल्पना प्रताप निंगवाळकर यांच्या घरी पाच ते सहा चोरट्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यांनी घरात झोपलेल्या कल्पनाताई आणि त्यांच्या नातेवाईकांवर दांडक्यांनी हल्ला केला आणि मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी असा अंदाजे ₹१,६४,००० किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. सीसीटीव्ही तपासणी दरम्यान चोरट्यांनी वापरलेल्या सिल्व्हर रंगाच्या तवेरा कारची माहिती मिळाली. साधारण १५० किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही फूटेज तपासून संबंधित वाहनाचे लोकेशन पाथडी परिसरात आढळून आले.
तपासादरम्यान माहिती मिळाली की सदर वाहनाचा वापर सराईत गुन्हेगार संजय गायकवाड करत असून त्यानेच टोळीच्या मदतीने दरोडा टाकल्याची शक्यता आहे. दि. ६ जुलै रोजी नगर-पुणे रोडवर संजय आणि सागर गाडीने जात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्यांना अटक केली.
दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी महाराष्ट्रातील अकोला, शेवगाव, पारनेर, मालेगाव आदी ठिकाणीही असेच गुन्हे केल्याचे उघड झाले. संजय गायकवाडवर पूर्वी १३ गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई झाली आहे. तो पाच वर्षे तुरुंगात होता आणि सहा महिन्यांपूर्वीच जामीनावर सुटला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पो.नि. संदेश केंजळे व पथकाने केली. तपासासाठी अधिकारी कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, आणि इतर अधिकारी सहभागी झाले.
या टोळीने गुन्हे करताना महिलांना मारहाण करून त्यांच्यावर दहशत निर्माण केली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळीला अटक करण्यात यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte