अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन. अंतिम फेरी मुंबईत.
सायली मेमाणे
पुणे १२ जुलै २०२५ : मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी रंगभूमीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेली प्रमुख संस्था असून, तिच्या शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या उपक्रमांतर्गत यंदाही राज्यभर खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नाव ‘नाट्य परिषद करंडक’ असे असून, ही स्पर्धा राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
या वर्षीपासून दरवर्षी ‘नाट्य परिषद करंडक’ या नावाने एकांकिका स्पर्धा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने घेतला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार २३ ऑगस्ट व रविवार २४ ऑगस्ट २०२५ रोजी विविध केंद्रांवर पार पडणार असून, अंतिम फेरी मुंबईतील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा- माहीम येथे १५ ते १८ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील हौशी, महाविद्यालयीन, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील कलावंतांसाठी ही स्पर्धा खुली असून, ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका मिळतील, त्या ठिकाणी प्राथमिक फेरीसाठी केंद्र देण्यात येईल. मागील वर्षी ‘नाट्यकलेचा जागर’ महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यवाचन, नाट्यछटा आणि नाट्यसंगीत गायन यांसारख्या विविध स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या होत्या.
या वर्षीच्या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या २५ कलाकृतींसाठी विशेष नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री मार्गदर्शन करणार असून अंतिम सादरीकरणाचा दर्जा उंचावण्याचा यामागे हेतू आहे.
स्पर्धेसाठी रोख पारितोषिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
- प्रथम क्रमांक: ₹1,00,000/-
- द्वितीय क्रमांक: ₹75,000/-
- तृतीय क्रमांक: ₹50,000/-
- दोन उत्तेजनार्थ पारितोषिके: ₹15,000/- प्रत्येकी
तसेच लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, स्त्री आणि पुरुष अभिनय या वैयक्तिक विभागांसाठी अनुक्रमे ₹7,000/-, ₹5,000/- आणि ₹3,000/- अशी रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
प्रत्येक सहभागी संस्थेस ₹2,000/- सादरीकरण मानधन देण्यात येणार असून सर्व सहभागी कलाकार आणि तंत्रज्ञांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. एकांकिकेसाठी प्रवेश फी ₹1,000/- असून प्रवेश अर्ज www.natyaparishad.org या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यभरातील कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, नाट्यशास्त्र विभागातील शिक्षार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte