मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; रिक्षा-टॅक्सीत हरवलेली वस्तू शोधण्यासाठी RTO ने 1800-22-0110 टोल फ्री नंबर सुरु केला.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रिक्षा-टॅक्सीत प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या वस्तू हरवतात, पण त्या शोधणं कठीण जातं. आता ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने पुढाकार घेत १८००-२२-०११० हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर कॉल करून प्रवासी आपली गहाळ वस्तू शोधू शकतील. ही सेवा केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, पनवेल आणि बोरिवलीसह सर्व आरटीओ हद्दीतील रिक्षा-टॅक्सीसाठी लागू आहे.
परिवहन आयुक्तालयाकडून प्रवाशांसाठी राबवले जाणारे उपक्रम वाहतूककोंडी कमी करण्यावर आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. रेल्वे, एसटी, बेस्ट यांसारख्या विभागांमध्ये हरवलेल्या वस्तूंसाठी आधीच स्वतंत्र तक्रार प्रणाली अस्तित्वात आहे. मात्र रिक्षा-टॅक्सीमध्ये प्रवासादरम्यान हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी एकत्रित, केंद्रीकृत सुविधा नव्हती. तीच आता या टोल फ्री क्रमांकाद्वारे उपलब्ध झाली आहे.
या नव्या व्यवस्थेचा मुख्य केंद्र अंधेरी येथील आरटीओमध्ये उभारण्यात आला आहे आणि हे केंद्र २४ तास कार्यरत असेल. अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी सांगितले की, एकाच क्रमांकाच्या माध्यमातून प्रवाशांना सुलभता आणि स्पष्टता मिळेल. कोणताही गोंधळ टाळण्यासाठी विविध नंबर ऐवजी एकच केंद्रीकृत सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
तक्रार प्रक्रिया तीन टप्प्यांत कार्यरत असेल: प्रवाशांकडून वस्तू हरवल्याची तक्रार नोंदवणे, चालकांकडून प्राप्त झालेल्या वस्तूंची नोंद घेणे, आणि खातरजमा करून ती वस्तू मूळ प्रवाशाला परत देणे. यासाठी एक सहायक मोटार वाहन निरीक्षक, दोन वरिष्ठ लिपिक आणि एक कनिष्ठ लिपिक अशा कर्मचाऱ्यांची रोटेशन प्रणालीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्याप्रमाणे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अॅप आधारित सेवांमध्ये अॅपवरून हरवलेल्या वस्तूंची नोंद करता येते, त्याच धर्तीवर आता रिक्षा-टॅक्सी सेवांमध्येही अधिकृत सोय निर्माण करण्यात आली आहे. काही प्रामाणिक चालक स्वतःहून वस्तू परत करतात, परंतु अधिक स्पष्ट आणि खात्रीशीर पद्धतीसाठी ही टोल फ्री सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
इतर वाहतूक यंत्रणांसाठी देखील खालील टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत:
- मध्य/पश्चिम रेल्वे: १३९, १५१२
- बेस्ट: १८०० २२ ७५५०
- एसटी महामंडळ: १८०० २२ १२५०
- मोनो रेल: १८०० ८८९ ०५०५
- मेट्रो-१: ९९३०३१०९००
- अॅप आधारित सेवा: संबंधित अॅपमध्ये तक्रार नोंदणी
मुंबईच्या दैनंदिन प्रवाशांसाठी ही सेवा एक मोठा दिलासा ठरणार असून, हरवलेल्या वस्तू पुनः मिळवण्यासाठीची आशा वाढली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte