• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोडाचुरा व गांजासह पाचजण अटकेत

Jul 14, 2025
पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोडाचुरा व गांजासह पाचजण अटकेतपुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोडाचुरा व गांजासह पाचजण अटकेत

पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने दोडाचुरा व गांजाच्या मोठ्या साठ्यावर कारवाई करत पाच आरोपींना अटक केली.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे १४ जुलै २०२४ : पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा यांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख ८८ हजार रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, या कारवायांमध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई १२ जुलै २०२५ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मांजरी रोड चौक, इंद्रप्रस्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून दोन इसम — राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१, मूळ रा. बिकानेर, राजस्थान) आणि ताराचंद सिताराम जहांगिर (वय २६, मूळ रा. नागौर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २,१५,५०० रुपये किंमतीचा ३.५६ किलो अफूच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) आणि इतर साहित्यासह अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. जोग सेंटर समोर, जुना मुंबई-पुणे महामार्गावर संशयित हालचालींवरून पोलिसांनी भागवत शिवाजी मंडलीक (वय २६), मुसीम सलीम शेख (वय २४), आणि महेश नारायण कळसे (वय २४) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ५,७२,६०० रुपयांचा २१.८६ किलो गांजा आणि इतर साहित्यासह अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही दोन्ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि पोलीस अंमलदारांची विशेष टीम कार्यरत होती. या पथकात प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांढर, संदीप जाधव, उदय राक्षे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयूर सुर्यवंशी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे आणि दिशा खेवलकर यांचा समावेश होता.

पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींकडून अंमली पदार्थ पुरवठ्याच्या साखळीचा शोध घेतला जात आहे. पुण्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला ही मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune