पुणे रिक्षा लूट प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! भीमाशंकर दर्शनादरम्यान रिक्षावाल्याने लुटल्याचा दावा खोटा ठरला. पोलिस तपासात वृद्धाचा बनाव उघड.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : पुणे रिक्षा लूट प्रकरण समोर आले असले तरी तपासातून धक्कादायक सत्य उघड झाले आहे. दिल्लीहून आलेल्या 69 वर्षीय वृद्धाने पुण्यातील भीमाशंकरच्या जंगलात रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात असा कोणताही लूटसदृश प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रिक्षा चालक निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले असून वृद्धानेच बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
हा प्रकार पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडला. दिल्लीतील वृद्ध रेल्वे स्थानकाबाहेर एका रिक्षा चालकाशी भीमाशंकर दर्शनासाठी १५ हजार रुपयांत करार करून रवाना झाले. त्यातील १० हजार रुपये रोख आणि ५ हजार ऑनलाइन दिले गेले. भीमाशंकर मंदिरात पोहोचल्यावर वृद्ध दर्शनासाठी गेले, परंतु ३ ते ४ तास उलटल्यानंतरही परतले नाहीत. रिक्षा चालकाने वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने तो पुण्याकडे परतला.
यानंतर वृद्धाने पोलिसांकडे तक्रार दाखल करताना भीमाशंकरच्या जंगलात रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा गंभीर आरोप केला. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि रिक्षाचालकाला तात्पुरते ताब्यात घेण्यात आले. मात्र चौकशी दरम्यान रिक्षाचालकाने आपली बाजू मांडताना सांगितले की, तो घटनास्थळी थांबला होता. वृद्ध परत न आल्याने त्याने अनेक वेळा फोन केला आणि अखेर नाईलाजाने तो परतला.
पोलिसांनी घटनास्थळ, मोबाईल लोकेशन आणि रिक्षाचालकाचे वक्तव्य यांचा तपशीलवार तपास केला असता वृद्धाचा आरोप बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा चालकाला क्लिनचिट देत नोटीस देऊन सोडले आहे. या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांची अनावश्यक धावपळ झाली असून, आता त्या वृद्धावर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या बनाव तक्रारी केवळ संसाधनांचा अपव्यय करतात, तसेच निरपराध व्यक्ती अडचणीत सापडते. त्यामुळे अशा खोट्या आरोपांवर आता कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter