• Sun. Jul 20th, 2025

NewsDotz

मराठी

एकेकाळचे राष्ट्रीय खेळाडू बनले दरोडेखोर! कानपूरमध्ये धक्कादायक घटना; आर्थिक संकटामुळे गुन्ह्याचा मार्ग

Jul 15, 2025
एकेकाळचे राष्ट्रीय खेळाडू बनले दरोडेखोर! कानपूरमध्ये धक्कादायक घटनाएकेकाळचे राष्ट्रीय खेळाडू बनले दरोडेखोर! कानपूरमध्ये धक्कादायक घटना

कानपूरमध्ये दोन राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना दरोड्याच्या आरोपाखाली अटक; आर्थिक अडचणीमुळे गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना.

सायली मेमाणे

कानपूर १५ जुलै २०२५ : कानपूर – देशासाठी खेळलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा जिंकलेल्या दोन युवकांनी आर्थिक संकटामुळे गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये समोर आली आहे. उत्कर्ष नावाच्या हॉकीपटू आणि श्रेयांस सिंग या हँडबॉलपटूला स्थानिक पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली असून, त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदार आरोपी म्हणून समोर आले आहेत. अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांना दिलेली कहाणी समाज आणि व्यवस्थेला अस्वस्थ करणारी ठरते.

११ जुलै रोजी दिल्लीहून कानपूरच्या रावतपूर रेल्वे स्थानकावर उतरलेले व्यापारी संकेत त्रिपाठी यांच्यावर या चौघांनी संगनमताने दरोडा टाकला. व्यावसायिक वाहनाच्या प्रतिक्षेत असताना चार आरोपी त्याच्याशी संवाद साधून त्याला ‘शिवली’ परिसरात सोडण्याचे आमिष दाखवले आणि वॅगनआर कारमध्ये बसवून नेले. वाटेत निर्जन जागी गाडी थांबवून त्याला मारहाण केली आणि रोख रक्कम, मोबाईल, वस्तू हिसकावून घेतल्या. एवढेच नव्हे तर व्यापाऱ्याच्या मोबाईलमधून त्याच्या खात्यातून UPIद्वारे ₹१५,००० स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर त्याला गाडीतून बाहेर ढकलून पळ काढला.

पीडित संकेत त्रिपाठी यांनी रावतपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चौघांनाही रविवारी अटक करण्यात आली. आरोपींपैकी दिनेश यादव याने यापूर्वी देखील अनेक गुन्हे केले असून, याच्याच मार्गदर्शनाने संपूर्ण कट रचण्यात आला होता. उत्कर्ष आणि श्रेयांसनेही पोलिसांसमोर कबूल केले की, आर्थिक अडचणी, फ्लॅटचे भाडे आणि वीजबिल भरण्यासाठी पैसे नसल्याने ते या मार्गाला लागले.

या घटनेबाबत एडीसीपी कपिल देव सिंह यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. यातील दोघे युवक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून, ते सध्या कानपूर विद्यापीठात डिप्लोमा करत होते. एकेकाळी देशाचं नाव उंचावणारे हे खेळाडू आज हातात हातोडा आणि गुन्ह्याचे साधन घेत हिंसेकडे वळले आहेत, ही बाब फारच गंभीर आहे.

या घटनेने संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारा संदेश दिला आहे. एकीकडे क्रिकेटसारख्या खेळात कोट्यवधींची उलाढाल होत असताना इतर खेळ आणि खेळाडू उपेक्षित राहत आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंना आधार मिळावा, त्यांच्यासाठी आर्थिक आणि सामाजिक योजनांची गरज आहे, हे पुन्हा अधोरेखित होते. अन्यथा राष्ट्रीय मान मिळवलेले खेळाडूही दारिद्र्याच्या गर्तेत गुन्हेगारीच्या मार्गावर सरकतील, ही खंतकारक बाब निश्चितच आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune