पुण्यात विंग कमांडरच्या घरावर पहाटे मोठा दरोडा; चोरट्यांनी ४० तोळे सोने आणि ₹८.५ लाखांची रोकड लंपास केली, शहरात खळबळ.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : पुणे – शहरात पुन्हा एकदा धक्कादायक चोरीची घटना घडली असून, यावेळी चोरट्यांनी थेट लष्कराच्या विंग कमांडरच्या घरावर दरोडा घालण्याचा धाडसी प्रकार केला आहे. जांभुळकर चौकात असलेल्या कौशल्या बंगल्यात विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या निवासस्थानी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दोन अज्ञात चोरट्यांनी थेट घरात घुसून कमांडर यांना धमकावले आणि तब्बल ४० तोळे सोने व साडेआठ लाख रुपयांची रोकड चोरून नेली.
विंग कमांडर जिंदाल हे आपल्या बंगल्यात झोपलेले असताना दोन चोरटे भिंतीवरून आत घुसले. त्यांनी थेट बेडरूममध्ये प्रवेश करून जिंदाल यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना जागं केलं. त्यानंतर त्यांना “हलू नका, नाहीतर परिणाम गंभीर होतील,” असा दम दिला. चोरट्यांकडे हातोडा, हेक्सा ब्लेड टाईपचे लोखंडी रॉड होते. त्यांनी धमकावत कमांडरकडून कपाटाची चावी हिसकावली आणि त्यामधील मौल्यवान वस्तू चोरल्या. या चोरट्यांनी एकूण ४० तोळे सोनं आणि ₹८.५ लाखांची रोकड घेऊन पलायन केलं.
चोरीची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बंगल्याला सुरक्षा असूनही चोरट्यांनी एवढ्या सहजतेने प्रवेश कसा केला, हे अद्यापही अनाकलनीय आहे. प्राथमिक तपासात चोरट्यांनी बंगल्याची संपूर्ण रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा आवाज न करता घरात प्रवेश करून, झोपलेल्या कमांडरला उशीराने जागं करून घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे. सायबर युनिट, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही चोरी पूर्वनियोजित असून चोरांनी कमांडर जिंदाल यांचा बंगला, त्याचा प्रवेशमार्ग, सुरक्षा व्यवस्था यांचा अभ्यासपूर्वक आढावा घेतला होता.
या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात झालेला दरोडा सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे. सध्या कमांडर जिंदाल यांना मानसिक धक्का बसला असून त्यांचे समुपदेशन सुरू आहे. पोलिसांना या चोरांचा माग काढण्याचे मोठे आव्हान आहे. लष्करी अधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालण्याची ही घटना गंभीर मानली जात असून, यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचीही शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
पुणे पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter