खेड तालुक्यात ट्रक ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने HR प्रोफेशनलचा मृत्यू; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : पुणे – खेड तालुक्यातील खालुंब्रे परिसरात सोमवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अपघात घडला. चाकण एमआयडीसी परिसरात खाजगी कंपनीत HR विभागात कार्यरत असलेल्या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू दुचाकी घसरल्याने झाला. गजानन बाबुराव बोलकेकर (वय 26, मूळगाव – नांदेड) असं मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात वास्तव्यास होता.
Accident link : https://www.instagram.com/p/DMHoJvZIrY3/
ही घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ह्युंदाई चौकाजवळ घडली. बोलकेकर हा कामावर जाण्यास उशीर झाल्याने त्याने आपल्या सहकाऱ्याकडून लिफ्ट घेतली होती. आदित्य गजाननराव गायकवाड (वय 23, रा. येलवाडी, खेड) हे दुचाकी चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य गायकवाड हे कंटेनर ट्रकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना दुचाकी घसरली. यामध्ये मागे बसलेले गजानन बोलकेकर रस्त्यावर पडले आणि चालू असलेल्या कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या आदित्य गायकवाड यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
या अपघातप्रकरणी कंटेनरचा चालक मोहम्मद अर्मान कमरुद्दीन खान (वय 30, रा. धारावी, मुंबई) याला निष्काळजीपणाचे वाहन चालवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) व मोटार वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन बोलकेकर हे चाकण एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत HR विभागात कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि मित्रमंडळात हळहळ व्यक्त केली जात आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी केलेला प्रयत्न त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरेल, याची कल्पना कुणालाच आली नव्हती.
या अपघातामुळे वाहनचालकांनी वाहतुकीदरम्यान अधिक काळजी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ओव्हरटेक करताना नियम मोडणे जीवघेणे ठरू शकते, याची जाणीव करून देणारी ही हृदयद्रावक घटना आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter