पुणे, रत्नागिरी, मुंबई, सांगली, रायगड व कोल्हापुरात जोरदार पावसाने हजेरी; हवामान खात्याकडून पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट.
सायली मेमाणे
पुणे १५ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, मुंबई, रत्नागिरी, सांगली, रायगड आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांना पावसामुळे बंद ठेवण्यात आले आहे. तसेच, मुंबईतील कांदिवली, बोरीवली, गोरेगाव, जोगेश्वरी आणि वांद्रे परिसरांत सकाळपासून दमदार पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही सकाळपासूनच मुसळधार पावसाचा जोर असून सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ढालघर फाट्याजवळ पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हसळा तालुक्यातील डोरजे पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. हवामान विभागाने यापूर्वीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव व अहिल्यानगर येथे मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातदेखील पावसाचा जोर काही भागांत मोठ्या प्रमाणावर जाणवला आहे. मात्र, पश्चिम विदर्भात अजूनही नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या धरणातील साठा फक्त ४८ टक्के असल्याने पाणीसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. कोल्हापूरमध्ये मात्र पावसाचं जोशात आगमन झालं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राजस्थानच्या पूर्व भागात आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागातून पुढे पश्चिम भारतात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पण हवामान खात्यानुसार २० जुलैपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांची गती सध्या कमी असल्यामुळे पाऊस काही काळासाठी थांबलेला असला, तरी बंगालच्या उपसागरात निर्माण होणारा दाब जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा पाऊस सक्रिय करणार आहे.
दरम्यान, नागरिकांना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी न जाता शक्यतो घरात राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter