लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यात निधन. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुणे – स्वातंत्र्यसंग्रामात निर्णायक भूमिका बजावलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज (बुधवार) पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांचे पार्थिव सकाळी ८ ते ११ या वेळेत पुण्यातील ऐतिहासिक टिळकवाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. दीपक टिळक यांनी टिळक कुटुंबाच्या सामाजिक आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा वारसा समर्थपणे पुढे नेला. ‘केसरी’ वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला. ते काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि नंतर कुलपती देखील राहिले.
२०२१ मध्ये जपानी भाषेच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून त्यांना गौरविण्यात आले होते. ते एक विचारवंत, कुशल व्यवस्थापक, पत्रकार, लेखक आणि शिक्षणप्रेमी होते.
डॉ. टिळक यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र काँग्रेस नेते रोहित टिळक, एक कन्या आणि नातवंड असा परिवार आहे. टिळक कुटुंबासाठी तसेच पुण्याच्या शैक्षणिक व पत्रकारितेच्या वर्तुळासाठी ही एक अपूरणीय हानी आहे.
“डॉ. दीपक टिळक यांनी ‘केसरी’च्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवली. त्यांनी शिक्षण आणि पत्रकारिता या क्षेत्रात दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. टिळक कुटुंबाचा विचारांचा आणि सेवाभावाचा वारसा त्यांनी निष्ठेने जपला. त्यांना माझी आदरांजली,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. दीपक टिळक हे केवळ टिळक घराण्याचे वारसदार नव्हते, तर मूल्यनिष्ठ पत्रकारितेचे प्रेरणास्त्रोत होते. त्यांचे स्मरण कायम प्रेरणादायी राहील.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter