कोंढवा परिसरात पुर्व वैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करणाऱ्या टोळीतील ७ आरोपी आणि २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना कोंढवा पोलिसांनी १२ तासांत अटक केली.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे १६ जुलै २०२५ : पुणे – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळनगर चौक एसबीआय कॉर्नर येथे ११ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारास, पुर्व वैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीतील ७ सराईत आरोपी व दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे.
या गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रात्री १० च्या सुमारास एसबीआय बँकेशेजारी पायी जात असताना, आरोपी राजू उर्फ राजा संगप्पा गुळकर (वय १८), तन्वीर अक्रम शेख (१९), सुरेंद्र उर्फ अमर साव (१९), कैलास गायकवाड (२२), कविराज उर्फ केडी देवकाते (१९), प्रेम उर्फ पप्या घुंगरगी (२२), यश उर्फ मास सोनटक्के (१८) आणि दोन अल्पवयीन मुलांनी फिर्यादीवर कोयते आणि तलवारीने हल्ला केला. डोक्यावर, पाठीवर, कमरेखाली व हातावर गंभीर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर आरोपींनी तलवारी हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.
कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. ५३७/२०२५ अन्वये भादंवि कलम 109, 189(2), 189(4), 191(1)(3), शस्त्र कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3), 135 व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याची गंभीरता ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप व वर्षा देशमुख यांनी तत्काळ पथके तयार करून शोध मोहिमेला सुरुवात केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी साळवे गार्डन मागे असलेल्या पडीक खोलीत लपून बसले होते. त्यानुसार पोलिसांनी चार पथकांची रचना करून अचानक छापा टाकत सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता १६ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे करत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, अंमलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, संतोष बनसुडे, सुरज शुक्ला, विजय खेगरे, राहुल शेलार, अभिजीत जाधव व इतर अधिकाऱ्यांनी योगदान दिले.
कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही धडक कारवाई महत्त्वाची ठरली आहे. पोलिसांकडून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा संदेशही या कारवाईतून दिला गेला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter