• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

आषाढी वारी 2025: माऊलींच्या परतीच्या वारीला नीरा नदीत स्नानाने सुरुवात, वारकऱ्यांना स्पर्शदर्शनाचा लाभ

Jul 16, 2025
आषाढी वारी 2025, माऊली परतीचा प्रवासआषाढी वारी 2025, माऊली परतीचा प्रवास

आषाढी वारीनंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा परतीचा प्रवास नीरा नदीत स्नानाने सुरू झाला. यंदा वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्शदर्शन देण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली, भक्तांमध्ये आनंदाची लाट.

सायली मेमाणे

नीरा (पुणे)१६ जुलै २०२५ :– संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास आज पुणे जिल्ह्यातील नीरा येथे पोहोचला. पारंपरिक परंपरेनुसार माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आलं आणि याच ठिकाणी वारकऱ्यांना स्पर्शदर्शनाचा लाभ देण्यात आला. यंदा वरुणराजाच्या उपस्थितीत झालेल्या या स्नान विधीमुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

पंढरपूरहून आळंदीकडे निघालेला माऊलींचा पालखी सोहळा सोमवारी रात्री सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे विसावला होता. आज सकाळी पालखीने पुणे जिल्ह्यातील नीरा येथे प्रवेश केला. नदीकाठी परंपरेनुसार माऊलींच्या पादुकांचे “परतीचे स्नान” पार पडले. या स्नानसोहळ्यावेळी “माऊली माऊली” च्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालं होतं.

या स्नानानंतर एक महत्त्वाची परंपरा जपली गेली – ती म्हणजे स्पर्शदर्शन. परतीच्या वारीत सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन त्यांच्या उभ्या असलेल्या ठिकाणी नेऊन देण्यात आले. गेल्या वर्षी ही परंपरा पाळली गेली नव्हती, ज्यामुळे काही तणाव निर्माण झाला होता. मात्र यंदा कोणताही गोंधळ न होता शांततेत आणि भक्तीभावाने स्पर्शदर्शनाची प्रक्रिया पार पडली.

माऊलींचा रथ नीरा येथील विठ्ठल मंदिरात विसावला होता. या ठिकाणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वारकऱ्यांना दुपारचे भोजन देण्यात आले. विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजता पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला.

या परतीच्या प्रवासात नीरा, वाल्हे, सासवड या पवित्र गावांमधून पालखी मार्गक्रमण करणार आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थ, भाविक आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. या वार्षिक परंपरेचा एक भाग म्हणून असंख्य भक्त पायी चालत माऊलींच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आहेत.

माऊलींच्या वारीत केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन होते. या यात्रेमुळे विविध भागांतून आलेले वारकरी एकमेकांशी संवाद साधतात, आपले अनुभव शेअर करतात आणि वारकऱ्यांची परंपरा पुढील पिढीकडे पोहोचवण्याचे कार्य होते.

संपूर्ण पालखी सोहळा हा शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची ही वार्षिक यात्रा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune