कोंढवा परिसराला मध्य पुण्याशी जोडणारी PMPML बस क्रमांक 101 सेवा सुरू; स्थानिक नागरिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुणे शहरातील कोंढवा परिसरातील रहिवाशांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या मागणीला अखेर यश आले आहे. येवलेवाडी येथून देक्कन जिमखाना दरम्यान PMPML बस सेवा क्रमांक 101 सुरू करण्यात आली असून, ही सेवा कोंढवा मार्गे धावणार आहे. या उपक्रमामुळे कोंढवा, येवलेवाडी, आणि परिसरातील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाशी अधिक सुलभपणे जोडणारी सोयीस्कर व सुरक्षित सेवा मिळणार आहे.
ही सेवा भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आली असून, उद्घाटनाचा समारंभ कोंढवा खुर्द येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात पार पडला. उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक, महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेमुळे दिवसभर प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बस सेवेचा मुख्य फायदा येवलेवाडी, कोंढवा, महम्मदवाडी आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना होणार आहे. ही बस सेवा पुणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती विभागातील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि दवाखान्यांपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बस मार्गाच्या वाढीमुळे नागरिकांना वेळ आणि पैशांची बचत होणार असून, खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल.
या उद्घाटन कार्यक्रमात PMPML चे अधिकारी नाईक व हेंद्रे, बस चालक हंडळ आणि वाहक खाताते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बस सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून, ही सेवा अधिकाधिक वेळा सुरू ठेवावी आणि संख्याही वाढवावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हडपसर विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे महासचिव अक्षय शिंदे यांनी सांगितले की, “या नव्या मार्गामुळे स्थानिक नागरिकांना कार्यालय, शाळा-कॉलेजेस, आणि रुग्णालयांमध्ये पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. हा एक मोठा दिलासा आहे.”
कोंढवा खालचा आणि येवलेवाडी परिसर पुणे शहराच्या दक्षिण भागात असून, येथे अनेक गृहनिर्माण प्रकल्प आणि वसाहती विकसित झाल्या आहेत. मात्र, सार्वजनिक वाहतूक सेवा अपुरी असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. PMPML च्या या नव्या बस मार्गामुळे या परिसरात सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
ही बस सेवा सोमवारपासून नियमित सुरू झाली असून, लवकरच या मार्गावरील बसच्या फेऱ्या आणि वेळा अधिक सुलभ करण्याचा PMPML चा प्रयत्न राहणार आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter