पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वॉर्ड ४० मध्ये तोडफोड, ईसीजी यंत्राचे नुकसान, सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व मारहाण. बंडगार्डन पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुणे : ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून ईसीजी यंत्राची तोडफोड करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ, धक्काबुक्की केली आणि वॉर्डच्या प्रवेशद्वाराची काच फोडली.
संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांपैकी एक रुग्णालयात उपचार घेत होता. सोमवारी (१५ जुलै) दुपारी एकच्या सुमारास दोघे नातेवाईकांना भेटण्याच्या उद्देशाने वॉर्ड क्रमांक ४० च्या परिसरात पोहोचले. सुरक्षारक्षक जाधव यांनी वेळेच्या आधी प्रवेश नाकारल्याने वाद निर्माण झाला. संतप्त झालेल्या आरोपींनी सुरक्षारक्षकांवर हात उगारला, शिवीगाळ केली आणि काठीने मारहाण करत रुग्णालयाची मालमत्ता नष्ट केली.
या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि तोडफोड केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ससून रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून गोंधळ, सुरक्षारक्षकांशी अरेरावी आणि डॉक्टरांवर हल्ल्यांचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. येरवडा कारागृहातील कैदी, तसेच परगावांतील रुग्ण ससूनमध्ये उपचारासाठी दाखल होतात. यामुळे रुग्णालय प्रशासनाने गेल्या महिन्यात ससूनच्या आवारात पोलीस चौकी सुरू केली होती. आमदार सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते चौकीचे उद्घाटन झाले. चौकी सुरू झाल्यापासून ससूनमधील चोरी आणि गोंधळाच्या घटनांमध्ये काहीसा आळा बसला आहे. मात्र, ही तोडफोड ही पोलीस चौकी सुरू झाल्यानंतरची पहिली गंभीर घटना ठरली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter