पुण्यात एक एमबीबीएस डॉक्टर ड्रग तस्करी करताना अटक; पोलिसांनी १५ लाख रुपयांचा MD ड्रग जप्त केला. कारमधून तिघे विक्री करत असल्याचे उघड.
सायली मेमाणे
पुणे १७ जुलै २०२५ : Pune Crime: एमबीबीएस डॉक्टर निघाला ड्रग तस्कर; पुण्यात १५ लाखांचा MD ड्रग जप्त, तिघांना अटक
पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एमबीबीएस डॉक्टरच ड्रग तस्करी करत असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत महंमद ऊर्फ आयान शेख या डॉक्टरसह दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १५ लाख रुपये किमतीचा मेफेड्रोन (MD) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बिबवेवाडीतील निमंत्रण हॉटेलसमोर करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये महंमद शेख (रा. उंड्री), सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (रा. हिंगणे खुर्द) आणि अनिकेत विठ्ठल कुडले (रा. नारायण पेठ) यांचा समावेश आहे. महंमद शेख हा मूळचा जम्मूचा असून, त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील नामांकित रुग्णालयात नोकरी केली होती. मात्र, पूर्वीही त्याच्यावर ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर त्याला डॉक्टर पदावरून निलंबित करण्यात आले होते. तरीदेखील त्याने अमली पदार्थांची तस्करी थांबवली नाही.
ही टोळी कारमधून ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली. महंमद शेखकडून ५ लाखांचे MD, सॅम्युअल प्रतापकडून ६.३८ लाखांचे MD तर कुडलेकडून सव्वा तीन लाखांचे MD जप्त करण्यात आले. याशिवाय एक कार व तीन मोबाईल फोन्सही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलिस तपासात असे समोर आले आहे की हे तिघे आपल्याच ओळखीतील लोकांना ड्रग पुरवत होते. यामधील अनिकेत कुडलेलाही यापूर्वी बंडगार्डन भागात ड्रग प्रकरणात अटक झाली होती. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत की, ही MD कुठून आणली गेली आणि यामागे आणखी कोणी गुन्हेगार आहे का.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter