• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

तळजाई वसाहतीत पिस्तूलसह रेकॉर्डवरील गुन्हेगार अटक – पुणे गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

Jul 17, 2025
पुण्यात तळजाई वसाहतीत रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टलसह अटकपुण्यात तळजाई वसाहतीत रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टलसह अटक

पुण्यात तळजाई वसाहतीत गुन्हे शाखा युनिट २ कडून सराईत गुन्हेगारास पिस्तूल व काडतुसासह अटक. आरोपी ओंकार मोकाशी याच्यावर याआधी ४ गुन्हे दाखल होते.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे १७ जुलै २०२५ – गुन्हे शाखा युनिट २ कडून तळजाई वसाहत, सहकारनगर येथे मोठी कारवाई करत अवैध पिस्तूल व जिवंत काडतुसासह रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. आरोपी ओंकार विजय मोकाशी (वय २९, रा. उत्तमनगर, पुणे) याच्याकडून ₹४०,४०० किंमतीचे सिल्व्हर रंगाचे पिस्टल, मॅगझीनसह एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.

दि. १५ जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना माहिती मिळाली की, सहकारनगर येथील तळजाई वसाहतीत एक इसम शस्त्रासह थांबलेला आहे. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर आणि पथक घटनास्थळी पोहोचले.

संशयास्पद इसमास अडवून नाव विचारले असता, त्याने आपले नाव ओंकार मोकाशी असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अवैध पिस्तूल व जिवंत काडतूस आढळले. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार मोकाशी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर उत्तमनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०७ अंतर्गत चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर आणि त्यांच्या पथकाने केली.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune