धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याने मोबाईल हॅकिंगच्या भीतीने आत्महत्या केली.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ताजपूरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील सनेर कुटुंबातील एकुलता एक मुलगा, बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर या 20 वर्षीय बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल हॅक होऊन त्याचे काही वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची भीती त्याला सतावत होती. यामुळे तो मानसिक तणावाखाली गेला होता आणि याच नैराश्यातून त्याने राहत्या घरी साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.
ही घटना समजताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलं. किशनच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. थाळनेर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. किशनचा मोबाईल हॅक झाला असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यातूनच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच भीतीमुळे किशनने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनच्या निकटवर्तीय मित्रांची चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या मोबाईलची सखोल तपासणी करून हॅकिंगचे पुरावे मिळण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर कोणत्या प्लॅटफॉर्मवर फोटो व्हायरल झाले होते, हे तपासण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. किशन बी.फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता आणि त्याचे वडील स्थानिक शेतकरी आहेत. कुटुंब आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय असून किशनवर कुटुंबाचे मोठे अपेक्षा होत्या.
ही घटना समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली असून शाळा-कॉलेज स्तरावर सोशल मीडियावरील सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीची मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, मोबाईल हॅकिंग, पासवर्ड लीक, आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर ही आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित गंभीर समस्या बनली आहे. किशनसारख्या युवकांवर याचा खोल परिणाम होत आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.
किशनची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नसून, समाजातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या परिणामांचे उदाहरण आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी दोषींना तत्काळ ओळखून कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच युवकांनी कोणत्याही दबावाखाली टोकाचे निर्णय न घेता योग्य वेळी मदत घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. किशनची आत्महत्या हे एक गंभीर सामाजिक चिंतनाचे कारण बनले आहे आणि यामुळे सायबर सुरक्षिततेबाबत अधिक सजगतेची गरज अधोरेखित झाली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter