कसारा स्थानकाजवळ रविवारी रात्री लोकल ट्रेनवर दरड कोसळून दोन प्रवासी जखमी झाले. पावसामुळे दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज; प्रशासनाकडून तत्काळ मदत कार्य.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : कसारा स्थानकाजवळ रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनवर टेकडीवरून दरड कोसळली. ही घटना ६ जुलै २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता घडली. दरड थेट ट्रेनवर कोसळल्याने दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरवाजाजवळ उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर दगड व माती पडल्याने ही इजा झाली.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात माती व दगड पसरल्याचे दिसून आले असून, स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दरड कोसळल्यानंतर ट्रॅकवरील अडथळे दूर करण्यात आले असून, वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र सध्या ती सुरळीत करण्यात आली आहे.
जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरड कोसळल्यानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ट्रेनच्या दरवाज्यातून माती आतपर्यंत शिरल्याचे स्पष्ट दिसते. हा फोटो पाहून अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून, प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. विशेषतः मुसळधार पावसात दरवाजाजवळ उभं राहणं टाळावं, असं प्रशासनाने सांगितलं आहे. ही घटना केवळ निसर्गाच्या कोपामुळे नव्हे तर संभाव्य निष्काळजीपणाची इशारा देखील मानली जात आहे. अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्रांत विशेष लक्ष देणं गरजेचं असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter