पुण्यात एका क्लास वन अधिकाऱ्याने पत्नीचे बाथरूममधील व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याने शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका क्लास वन अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या खाजगी जीवनात घुसखोरी करत विकृतीचा कळस गाठला. पीडित पत्नी देखील क्लास वन अधिकारी असून, तिच्या पतीने घरात आणि विशेषतः बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे लावून तिचे आंघोळ करतानाचे आणि इतर खाजगी क्षणांचे व्हिडीओ शूट केले. त्यानंतर या व्हिडीओंचा वापर करून पत्नीला ब्लॅकमेल करत तिच्याकडून गाडी आणि घराच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी पीडित महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या विकृत प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती लग्नानंतर सातत्याने पत्नीवर संशय घेऊन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. तो तिच्यावर शिवीगाळ, मारहाण करत होता आणि तिच्या चारित्र्यावर वारंवार शंका घेत होता. पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवण्यासाठी त्याने घरात विविध ठिकाणी, अगदी बाथरूममध्ये सुद्धा स्पाय कॅमेरे बसवले. त्यातून तो नियमितपणे तिचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचा आणि त्यावरून धमकी देत दीड लाख रुपये मागायचा.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे आरोपी आणि पीडिता दोघेही उच्चशिक्षित आणि प्रशासनातील वरिष्ठ पदावर आहेत. त्यामुळे अशा कृत्याची अपेक्षा अजिबात केली जात नाही. क्लास वन अधिकारी पदाची सामाजिक जबाबदारी असते, पण या घटनेत आरोपी पतीने त्याचा पूर्ण गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने केवळ पत्नीचे खाजगी जीवन उध्वस्त केले नाही, तर पत्नीला आर्थिक आणि मानसिक छळाचा भयानक अनुभव दिला. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध आयटी अॅक्ट, मानसिक छळ, धमकी देणे, आणि वैयक्तिक गोपनीयतेचा भंग यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेने शेवटी हा त्रास असह्य झाल्याने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीतून हे प्रकरण बाहेर आले आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्यात आरोपी पतीव्यतिरिक्त सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईक यांचा समावेश आहे, जे सतत पीडितेवर दबाव टाकत होते. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींची चौकशी केली जात आहे.
ही घटना सामाजिकदृष्ट्या अत्यंत गंभीर असून वैवाहिक नात्यातील विश्वासघात, सायबर गुन्हे आणि महिलांवरील छळ यांचे प्रतीक आहे. पीडित महिलेने न्याय मिळवावा आणि समाजात अशा प्रकारांना आळा बसावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter