• Wed. Jul 23rd, 2025

NewsDotz

मराठी

पिंपरी-चिंचवडमध्ये शिस्तीचा बडगा! आयुक्त शेखर सिंह यांचा लेटलतिफ अधिकाऱ्यांना इशारा

Jul 23, 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्तांचा शिस्तीचा बडगा; उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारापिंपरी-चिंचवड महापालिकेत आयुक्तांचा शिस्तीचा बडगा; उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचा इशारा दिला आहे.

सायली मेमाणे

पुणे २३ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनात वेळेचे पालन न करणाऱ्या आणि कार्यालयात वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या बैठकीत अनेक अधिकारी उशिरा हजर राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या कारभारात अधिक शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शनिवारी झालेल्या जनसुनावणी दरम्यान अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर होते किंवा उशिरा आले होते. नागरिकांच्या प्रश्नांना वेळेत उत्तरे देणे आणि त्यांचे तक्रारी वेळेत निवारण करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, अधिकारीच वेळेचे पालन करत नसल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी थेट कारवाईचा इशारा दिला.

महापालिकेच्या नियमांनुसार कार्यालयीन वेळ सकाळी १०:०० वाजता सुरू होते. मात्र अनेक अधिकाऱ्यांचे वेळेवर अनुपस्थित राहणे ही नागरिकांच्या सेवांमध्ये विलंब आणि अडथळा निर्माण करणारी बाब ठरत आहे. आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत, जर ही सवय कायम राहिली तर शिस्तभंगाच्या कारवाया करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

शेखर सिंह यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचित केले की, कार्यालयात वेळेवर हजर राहणे ही केवळ शिस्तीचा भाग नसून नागरिकांप्रती असलेली जबाबदारीदेखील आहे. “महापालिकेत नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येतात. त्या वेळेतच सोडवणं आवश्यक आहे. अधिकारीच वेळेवर न आल्यास हे कार्य कसे होणार?” असा सवाल आयुक्तांनी उपस्थित केला.

याशिवाय, यापुढील काळात जनसुनावणी बैठकीत अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यावर विभागीय कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी सूचित केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ही देशातील एक कार्यक्षम महानगरपालिका म्हणून ओळखली जाते, आणि ही शिस्तबद्धता त्याच ओळखीला बळकट करणारी ठरणार आहे.

शिस्तीचा बडगा उचलून आयुक्त शेखर सिंह यांनी एक प्रकारचा प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला आहे. आता यानंतर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहून आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune