• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवर; ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप

Jul 24, 2025
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवरपंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री सक्तीच्या रजेवर

पंढरपूर आषाढी वारीमध्ये दर्शन रांगेतील शेड आणि बॅरिगेटिंगसाठी ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यावर; समितीकडून सखोल चौकशी सुरू, श्रोत्री सक्तीच्या रजेवर.

सायली मेमाणे

पुणे पंढरपूर २४ जुलै २०२५ :आषाढी वारीदरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन रांगेसाठी करण्यात आलेल्या शेड आणि बॅरिगेटिंगच्या कामांमध्ये घोटाळ्याचा आरोप आता अधिकच गंभीर वळण घेत आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना या आरोपांनंतर तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, श्रोत्री यांनी ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा व्हाईस रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर मंदिर समितीच्या आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. समितीने यावर तात्काळ निर्णय घेत, श्रोत्रींना जबाबदारीमधून दूर करत सक्तीची सुट्टी दिली आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली असून, ती आठ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. समितीचा निर्णय येईपर्यंत श्रोत्री यांना कामापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, “२६ जून ते १६ जुलैदरम्यान काही तक्रारी आल्या होत्या. दर्शन रांगेतील टेंट लावण्याच्या संदर्भात काही आर्थिक व्यवहार झाल्याच्या व्हिडीओ क्लिप्स आणि तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावरून हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले असून, समिती निष्पक्ष चौकशी करून अहवाल देईल.”

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, आषाढी वारीच्या काळात हजारो भाविकांच्या व्यवस्थेसाठी तयारी करते. यामध्ये दर्शन रांगा, पत्रा शेड, बॅरिगेटिंग, पिण्याच्या पाण्याची सोय यांचा समावेश होतो. मात्र या व्यवस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

या चौकशीमुळे पंढरपूरमधील मंदिर व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भाविकांमध्येही चिंता वाढली आहे. समितीचा अहवाल काय निष्कर्ष देतो आणि त्यावर पुढील कारवाई काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune